ताजमहाल खिळखिळा होतोय; मजले, भिंतींना अनेक ठिकाणी तडे

ताजमहालला तडे गेल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वीच सोशल मीडिया तसेच वृत्तपत्रांमधून प्रकाशित झाले. परंतु, ताजमहाल अक्षरशः खिळखिळा होत चालल्याचे समोर आले आहे. मोदी सरकारच्या दुर्लक्षामुळे जागतिक वारसास्थळ असलेल्या ताजमहालची दुरवस्था होत चालली आहे. मजले, भिंतींना अनेक ठिकाणी तडे गेले असून काही ठिकाणी झुडपेही उगवली आहेत. मुसळधार पावसात या तड्यांमधून झालेल्या पाणीगळतीमुळे ताजमहालची झालेली अवस्था समोर आली. याबाबतचे व्हिडीओ, फोटो तुफान व्हायरल झाले असून ताजमहालची तातडीने दुरुस्ती, डागडुजी करण्याची मागणी होत आहे.

ताजमहालच्या मुख्य डोमजवळ असलेल्या दरवाजांवरील अरेबिक भाषेतील पुराणातील शब्द ताजमहालची डागडुजीच झालेली नसल्याने दिसेनासे होत चालले आहेत. मौल्यवान दगडांपासून तयार करण्यात आलेल्या ताजमहालला अनेक ठिकाणी तडे गेलेले आहेत. पश्चिमेकडील दरवाजातील दगडाला अनेक ठिकाणी चिरा गेलेल्या आहेत.

पुरातत्त्व विभाग हा ताजमहालला तडे गेले नसल्याचा दावा करत आहे. यावरून त्यांनी ताजमहालची काय पाहणी केली, असा सवाल टुरिस्ट गाइड्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष दीपक दान यांनी केला आहे. ताजमहाल जगात प्रसिद्ध वारसास्थळ आहे. त्यामुळे त्याची झालेली नकारात्मक प्रसिद्धी झपाट्याने पसरते हेदेखील लक्षात ठेवायला हवे. या प्रसिद्धीमुळे या ठिकाणाचे महत्त्व कमी होऊ शकते अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

चिंतेचे कारण नाही – पुरातत्व विभाग

ताजमहालच्या डागडुजीसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. या वास्तूचे वेळोवेळी ऑडिट केले जाते. त्यामुळे चिंतेचे काही कारण नाही असे हिंदुस्थानच्या पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक राजकुमार पटेल यांनी म्हटले आहे. वैज्ञानिक प्रोटोकॉल्स पाळून या वास्तूचे जतन करण्याचे काम सातत्याने होत आहे.

अनेक ठिकाणी रोपटी उगवल्याप्रकरणी ते म्हणाले. मुसळधार पावसामुळे अशाप्रकारे रोपटे उगवू शकते. परंतु, तीही काढण्यात येतील, त्यामुळे याचा गाजावाजा करण्याचे कारण नाही, असेही पटेल म्हणाले. ताजमहालच्या भिंतींना तडे गेलेले असतानाही पुरातत्व विभागाकडून चिंतेचे कारण नसल्याचे सांगितले गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.