तीन वर्षांत 243 बांगलादेशी घुसखोरांना हुसकावून लावले, किल्ला कोर्टाची धडाकेबाज कारवाई

>> आशिष बनसोडे

मिळेल त्या मार्गाने हिंदुस्थानात घुसखोरी करून नको ते कृत्य करणाऱया बांगलादेशी नागरिकांचा प्रश्न जटिल बनला आहे. नुकतेच अभिनेता सैफ अली खान याच्यावर घरात घुसून एका बांगलादेशी घुसखोराने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटनादेखील घडली. असे असतानाच मुंबईच्या एस्प्लनेड 8 वे न्यायालयाने या बांगलादेशी नागरिकांची आधीपासूनच गंभीर दखल घेत गेल्या तीन वर्षांत 243 घुसखोरांना माघारी धाडण्याची कारवाई केली आहे.

बांगलादेशात हिंदुस्थानींवर अत्याचार सुरू आहेत, पण तेथील नागरिक सहजरीत्या हिंदुस्थानात घुसून आश्रय घेत आहेत. यापेक्षाही गंभीर म्हणजे हिंदुस्थानात येणाऱया बांगलादेशी घुसखोरांना आधारकार्ड, पॅनकार्ड, शिधापत्रिका यासारखे महत्त्वाची कागदपत्रेदेखील काही समाजकंटक पैशांच्या लालसेपोटी बनवून देत आहेत. शिवाय त्यांची कुठलीही शहानिशा न करता त्यांना बांधकामाच्या तसेच अन्य ठिकाणी रोजगारही दिला जातोय. त्यामुळे राहण्याचा आणि पोटापाण्याचा प्रश्न सुटत असल्याने ते सुखातच येथे राहतात, परंतु काही दिवस येथे राहिल्यानंतर बरेच बांगलादेशी घुसखोर गैरकृत्य करतात. त्यांच्याकडे भारतीय रहिवासी असल्याची बनावट कागदपत्रे सापडतात. त्यामुळे या बांगलादेशी नागरिकांचा गंभीर प्रश्न बनला आहे. एस्प्लनेड 8 वे न्यायालयाच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी के. एस. झंवर यांनी तर आधीपासूनच कठोर भूमिका घेत 243 बांगलादेशी घुसखोरांना त्यांच्या मायदेशी पाठविण्याचा आदेश दिले आहेत.

पोलिसांच्या विशेष मोहिमेला यश

राज्यातील पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरांची धरपकड सुरू केली आहे. दररोज बांगलादेशींना पकडून त्यांना न्यायालयात हजर केले जात आहे. मुंबई पोलीसदेखील दरदिवशी या घुसखोरांना पकडत आहेत. पोलिसांच्या विशेष मोहिमेला न्यायालयात यश लाभत आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी के. एस. झंवर यांनी वर्ष 2022 मध्ये 19, 2023 मध्ये 72, 2024 मध्ये 146 आणि गेल्या 20 दिवसांत 6 अशा प्रकारे एकूण 243 घुसखोर बांगलादेशींना माघारी पाठविण्याचे आदेश दिले आहेत.

अशीच कारवाई अपेक्षित

एस्प्लनेड 8 वे न्यायालय बांगलादेशींविरोधात जबरदस्त कारवाई करत आहेत. अशीच कारवाई अपेक्षित आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनीदेखील कायदेशीर बाबी पूर्ण करून संबंधितांना झटपट त्यांच्या देशात पाठवावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.