न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरण, 168 कोटींची मालमत्ता जप्त करण्यास पोलिसांना मुभा; ठेवीदारांना कोर्टाचा दिलासा

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यातील पाच आरोपींच्या 168 कोटी रुपयांच्या 21 मालमत्ता जप्त करण्यास दंडाधिकारी न्यायालयाने पोलिसांना परवानगी दिली आहे. त्यानुसार पोलीस लवकरच संबंधित मालमत्तांवर जप्ती आणणार असून तशा कार्यवाहीला लगेच सुरुवातही केली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 107 अन्वये मालमत्ता जप्तीची ही पहिली कारवाई केली जाणार आहेत. त्यामुळे न्यू इंडिया बँकेच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवीचे अडकलेले पैसे परत मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे.

न्यू इंडिया बँकेतील कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) न्यू इंडिया बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे हजारो ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेमार्फत (ईओडब्ल्यू) या घोटाळ्याचा अधिक तपास केला जात आहे. याच तपासादरम्यान पाच आरोपींच्या मालमत्ता जप्त करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे परवानगी मागत अर्ज केला होता. त्यावर दंडाधिकारी न्यायालयाने पोलिसांची विनंती मान्य करीत पाच आरोपींच्या 21 स्थावर मालमत्ता जप्त करण्यास परवानगी दिली आहे. या मालमत्तांची अंदाजे किंमत 167.85 कोटी रुपये असल्याचे ईओडब्ल्यूमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

या मालमत्तांवर येणार टाच

  • हितेश मेहताचे सात फ्लॅट्स, एक दुकान आणि बंगला (किंमत 12 कोटी)
  • अरुणाचलम मरुथुवरचे दुकान (किंमत 1.5 कोटी)
  • कपिल देढियाचा फ्लॅट (किंमत 75 लाख)
  • पाटणा आणि मधुबनी येथील मालमत्ता (प्रत्येकी 50 लाख)
  • जावेद आझमच्या डिजिटल दुनिया स्टोअर्समधून जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू (किंमत 55 लाख)
  • चारकोप येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प (किंमत 150 कोटी)

भाजप नेत्याच्या भावाचीही मालमत्ता जप्त करणार

बँक घोटाळा प्रकरणात पोलिसांनी गेल्या महिन्यात भाजपचे नेते हैदर आझम यांचा भाऊ जावेद आझमला अटक केली होती. अरुणाचलम ऊर्फ अरुण भाईची पोलीस चौकशी सुरू असताना जावेदचा घोटाळ्यातील सहभाग उघड झाला होता. जावेदची 55 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली जाणार आहे.