
बालमनावर झालेले बलात्काराचे घाव कधीही भरून निघत नाहीत. किशोरावस्थेवरही याचा खोलवर परिणाम होतो, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने एका बलात्काऱयाची शिक्षा रद्द करून जामीन देण्यास नकार दिला.
कैलास गायकवाड असे या आरोपीचे नाव आहे. सहा वर्षांच्या पीडितेवर अत्याचार केल्याचा त्याच्यावर आरोप होता. यासाठी दोषी धरत ठाणे विशेष पोस्को न्यायालयाने त्याला दहा वर्षांची शिक्षा व दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. 2019 मध्ये ठाणे न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला गायकवाडने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
ही अपील याचिका प्रलंबित असेपर्यंत शिक्षेला अंतरिम स्थगिती देऊन जामीन मंजूर करावा, अशी विनंती कैलासने केली होती. न्या. आर. एन. लढ्ढा यांच्या एकलपीठाने ती फेटाळून लावली. लहान वयात झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे मुलांच्या मनावर आघात होऊ शकतो. मनावर झालेल्या या जखमा कधीही भरून न निघणाऱया असतात, असेही न्यायालयाने नमूद केले.
पीडितेच्या साक्षेवर संशय
पीडिता लहान असूनही ती साक्ष देताना डगमगली नाही. तिच्या बोलण्यात सातत्य होते. यावर कैलासने संशय व्यक्त केला. पोलिसांचे पुरावेदेखील निःसंदेह असल्याचा दावा त्याने केला. हा दावाही न्यायालयाने फेटाळून लावला. पीडितेच्या बोलण्यात सातत्य होते हा जामीन मंजूर करण्यासाठी आधार असू शकत नाही, असे न्या. लढ्ढा यांनी स्पष्ट केले.
ऍड. अरफान सेठ यांचा दावा
कैलास हा पीडितेचा नातलग आहे. दोघेही नवी मुंबईत राहतात. मंदिरातून घरी जात असताना कैलासने पीडितेला त्याच्या घरी नेले. तिच्यावर अत्याचार केला. हा गंभीर गुन्हा असून त्याने नात्याचा विश्वासघात केला आहे. त्याला जामीन मंजूर करू नये, अशी मागणी सरकारी वकील अरफान सेठ यांनी केली. ती न्यायालयाने मान्य केली.