लग्न मोडलं म्हणजे आयुष्याचा शेवट होत नसतो, सुप्रीम कोर्टाचा जोडप्याला सल्ला

एखाद्याचे लग्न तुटले याचा अर्थ त्याचे संपूर्ण आयुष्य संपलेय असे होत नाही. जे झाले ते सगळे विसरून तुम्ही पुढे जायला हवे, असा महत्त्वपूर्ण सल्ला सुप्रीम कोर्टाने एका जोडप्याला दिला. सर्वोच्च न्यायालयात अशाच एका प्रकरणाची सुनावणी झाली असता सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश अभय ओक यांनी संबंधित जोडप्याचे समुपदेशन केले. मे 2020 मधील हे प्रकरण असून जोडप्याचे लग्न झाल्यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाला. यामुळे या जोडप्याने एकमेकांवर एकूण 18 खटले दाखल केले होते, परंतु सर्वोच्च न्यायालयाने हे खटले रद्दबातल ठरवत दोघांनाही आयुष्यात पुढे जाण्याचा सल्ला दिला. दोन्ही पक्षकार तरुण आहेत. त्यांनी आता भविष्याकडे पाहिले पाहिजे. जर लग्नात अपयश आले असले तरी हा आयुष्याचा शेवट नाही. दोघांनीही आता नव्या आयुष्याची सुरुवात करायला हवी, असे खंडपीठाने म्हटले. जोडप्याने यापुढे शांततेत जगावे, असा सल्लाही खंडपीठाने या दोघांना दिलाय. गेल्या काही वर्षांपासून देशभरातील जोडप्यांचा वाद सर्वोच्च न्यायालयात मोठय़ा प्रमाणात पोहोचत आहे. त्यामुळे घटस्फोटाचे प्रमाणही वाढल्याने यावर सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. या जोडप्याने एकमेकाविरोधात 18 खटले दाखल केले होते. हे खटलेसुद्धा सर्वोच्च न्यायालयाने रद्द करून या जोडप्यांना नवे आयुष्य जगण्याचा सल्ला दिला.

काय आहे प्रकरण…

लग्न झाल्यानंतर एक वर्षाच्या आतच विवाहितेने सासरचे घर सोडले. मे 2020 मध्ये लग्न झाल्यानंतर काही महिन्यांतच विवाहितेने सासर सोडून माहेरी राहू लागली होती. पती आणि सासरच्या लोकांकडून सतत छळ होत असल्याचा आरोप या विवाहितेने केला होता. यानंतर वकिलांनी संविधानाच्या कलम 142 अंतर्गत न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात सदर लग्न विसर्जित करण्याची विनंती केली, परंतु न्यायाधीश अभय ओक यांनी या जोडप्याचे समुपदेशन करत नवे आयुष्य जगण्याचा सल्ला दिला.