Ollie Robinson : एकाच ओव्हरमध्ये दिल्या तब्बल 43 धावा, आगळ्यावेगळ्या विक्रमाने इंग्लंडचा गोलंदाज चर्चेत

अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या T20 World Cup 2024 मध्ये चाहते चौकार आणि षटकारांची आतिषबाजीचा पाहण्यासाठी पूर्ण सामना पाहत आहेत. परंतु दुसरिकडे इंग्लंडमध्ये एकाच षटकात चौकार आणि षटकारांची तुफान फटकेबाजी चाहत्यांना पाहायला मिळाली. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनने काउंटी चॅम्पियनशीपमध्ये एक लाजिरवणा विक्रम आपल्या नावावर केला असून त्याने एकाच षटकात तब्बल 43 धावा दिल्या आहेत.

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या काउंटी चँम्पियनशीपमध्ये लीसेस्टरशायरविरुद्ध ससेक्स हा सामना एतिहासीक ठरला. या सामन्यातील दुसऱ्या डावातील 59 व्या षटकाची नोंद इतिहासात झाली आहे. 59 वे षटक टाकण्याची जबाबदारी ससेक्सच्या ओली रॉबिन्सनवर सोपवण्यात आली होती. त्याच्या समोर लीसेस्टरशायर संघाचा किंबर 72 धावांवर फलंदाजी करत होता. मात्र याच षटकात किंबरने आपले शतक सुद्धा पूर्ण केले. रॉबिन्सनने या षटकात एकूण 9 चेंडू फेकले यामध्ये पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर नो-बॉल आणि चौकर, तिसऱ्या चेंडूवर चौकार, चौथ्या चेंडूवर षटकार, पाचव्या चेंडूवर चौकार, सहावा चेंडूवर नो-बॉल आणि चौकार, सातवा चेंडू चौकार, आठव्या चेंडूवर नो-बॉल आणि चौकार, शेवटच्या चेंडूवर एक धाव, अशा एकूण 9 चेंडूंमध्ये 43 धावा रॉबिन्सनने दिल्या.

प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महागडे षटक 1990 मध्ये टाकण्यात आले होते. वेलिंग्टन आणि कँटरबरी यांच्यात झालेल्या शेल ट्रॉफी सामन्यादरम्यान, न्यूझीलंडचा माजी फिरकीपटू व्हर्ट व्हॅन्सने एका षटकात 17 नो-बॉल टाकत 77 धावा दिल्या होत्या. व्हर्ड व्हॅक्सनच्या नंतर सर्वाधिक धावा देणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आता ओली रॉबिन्सनच्या नावाच समावेश झाला आहे.