
विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील चार जागांवर झालेल्या निवडणुकांची मतमोजणी उद्या होणार आहे. मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ तसेच कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीची मतमोजणी नेरूळ येथील आगरी-कोळी संस्कृती भवनामध्ये सकाळी 8 वाजल्यापासून होणार आहे.
मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी शिवसेनेचे उमेदवार ऍड. अनिल परब आणि भारतीय जनता पक्षाचे किरण शेलार यांच्यात लढत झाली. अनिल परब यांना सुरुवातीपासूनच या मतदारसंघात पदवीधर मतदारांचा चांगला प्रतिसाद लाभला. त्यामुळे त्यांचा विजय जवळजवळ निश्चित मानला जात आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघात चुरशीची लढत झाली असली तरी शिवसेनेचे उमेदवार ज. मो. अभ्यंकर यांच्याही विजयाची खात्री व्यक्त केली जात आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघाचे दोन वेळा प्रतिनिधित्व केलेल्या निरंजन डावखरे यांना यावेळी तिसऱ्यांदा भाजपकडून उमेदवारी मिळाली असली तरी लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या विजयाचे पडसाद या निवडणुकीतही उमटून काँग्रेसचे रमेश कीर यांना लाभ होईल असा अंदाज आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघातही शिवसेना उमेदवार संदीप गुळवे यांना मिंधे गटाच्या किशोर दराडे आणि अजित पवार गटाचे महेंद्र भावसार यांच्यातील मतविभाजनाचा लाभ मिळेल असे सांगितले जाते. नाशिकमध्ये अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणी होणार आहे.