सुप्रिमो चषकासाठी 16 संघ भिडणार, टेनिस क्रिकेटच्या विश्वचषकाचे काऊंटडाऊन सुरू…

‘टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप’ अशी ख्याती असलेल्या ‘सुप्रिमो चषका’चे काऊंटडाऊन सुरू झाले असून क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 9 ते 13 एप्रिल या कालावधीत दररोज सायंकाळी 7 वाजता सांताक्रुझ पूर्व येथील एअर इंडिया मैदानावर होणाऱया या नॉक आऊट क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झालेल्या 16 संघांची शनिवारी घोषणा करण्यात आली. विजेतेपद पटकावण्यासाठी या 16 टीम मैदानात आमने-सामने येणार आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते-आमदार अॅड. अनिल परब आणि आमदार संजय पोतनीस यांनी सुप्रिमो चषकाचे आयोजन केले आहे. स्पर्धेचे यंदाचे अकरावे वर्ष असून दरवर्षी या टेनिस क्रिकेट स्पर्धेला स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद मिळतो. आठ षटकांचे हे सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता असते. यंदा या स्पर्धेसाठी राज्य आणि जिल्हा पातळीवर 65 टीमनी नोंदणी केली होती. त्यातील पात्र 16 टीमची घोषणा सुप्रिमो चषक समितीकडून शनिवारी करण्यात आली. या स्पर्धेसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) आणि एअर इंडियाने मोलाचे सहकार्य केले आहे.

सुप्रिमो चषकासाठी सहभागी झालेल्या 65 टीममधून आम्ही 16 टीमची स्पर्धेसाठी निवड केली आहे. प्रत्येक टीममधील सर्वच्या सर्व 15 खेळाडू प्रोफेशनल आणि तोलामोलाचे असून त्यांनी देशपातळीवर आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. या सर्व बाबी तपासूनच संघाची निवड केली आहे. – संजय पोतनीस, आयोजक-आमदार

सुप्रिमोमुळे टेनिस क्रिकेटला मिळाले वलय

सुप्रिमो चषक सुरू होण्यापूर्वी टेनिस क्रिकेट स्पर्धेला फारसे वलय नव्हते. सुप्रिमो चषकाच्या अमाप लोकप्रियतेनंतर आता अशा प्रकारच्या टेनिस क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याची जणू स्पर्धा लागलीय. त्यातून चांगले टेनिस खेळाडू तयार होतायत. पूर्वी टेनिस क्रिकेट टीमना आपल्या पदरचे पैसे टाकून स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचावे लागायचे. आता त्यांना चांगले स्पॉन्सर्स मिळत असून स्पर्धेच्या ठिकाणी ते चक्क विमानाने पोहोचतात. स्पर्धा संपेपर्यंत चांगल्या हॉटेलमध्ये राहतात. काही खेळाडू तर वर्षाला कोटय़वधींची कमाई करतायत.

निवड झालेले संघ

  • डिंग डाँग (रेड डेव्हिल्स), पुणे
  • एंजल धमाका, कोलकाता
  • बालाजी क्लब, मुंबई
  • पंधारी किंग्ज, मुंबई
  • ताई पॅकर्स, पालघर
  • एफ. एम. हॉसपेट, कर्नाटक
  • रायगड ट्रायडेंट
  • एल. के. स्टार, राजकोट
  • रार हॅरी रीबडा, राजकोट
  • विक्रोलीयन्स रोहित इलेव्हन, मुंबई
  • शांतिरत्न, डोंबिवली
  • एस. डी. प्रहार इलेव्हन, पुणे
  • साईश इलेव्हन, सिंधुदुर्ग
  • यू. एस. इलेव्हन, मुंबई
  • सुलतान ब्रदर्स पायराईट्स, केरळ
  • दुर्गापूर फ्रेंडस् युनियन क्लब, कोलकाता