कापूस, सोयाबीनपाठोपाठ तूर, हळद उत्पादकांवर संक्रांत; गेल्या वर्षीच्या तुलनेत तुरीचे भाव निम्मे, हळदीचे भावही घसरले

कापूस, सोयाबीनपाठोपाठ आता तूर व हळद उत्पादक शेतकऱ्यांवर तूर व हळदीचे भाव कमालीचे घटल्याने मोठे संकट ओढवले असल्याने शेतकरी हताशपणे सरकारकडे पहात आहे.

परभणी जिल्ह्यात यावर्षी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना या हंगामात कापूस आणि सोयाबीनला चांगला भाव मिळेल, अशी मोठी अपेक्षा होती. परंतु, कापूस उत्पादकांच्या अपेक्षा अक्षरशः फोल ठरल्या. कारण बाजारपेठांमधून, मार्केट यार्डामधून कापसास अपेक्षेएवढा भाव मिळाला नाही. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस सांभाळण्याऐवजी विक्री केला. त्याप्रमाणेच सोयाबीन उत्पादकांना सुद्धा

तोच मार्ग पत्करावा यावर्षी अपेक्षेएवढा भाव मिळाला नाही. 3 हजार 500 ते 4 हजार या दरम्यानच सोयाबीनचे दर स्थिरावले. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांना मोठा आर्थिक तडाखा बसला. या दोन पिकांनी मोठा हात दिल्याने या जिल्ह्यातील शेतकरी अक्षरशः हतबल झाला आहे. त्यात आता तूर उत्पादक व हळद उत्पादक शेतकऱ्यांवर सुध्दा मोठी संक्रांत कोसळली आहे. त्याचे कारण स्पष्ट आहे. गेल्या वर्षीचे तुरीचे भाव ओळखून शेतकऱ्यांनी तुरीचे क्षेत्र वाढविले खरे, परंतु गेल्यावर्षी प्रतिक्विंटल 11 हजार रुपयांच्या तुलनेत यावर्षी तूर उत्पादकांना अक्षरशः अर्ध्या किमतीत म्हणजे साडेपाच ते सहा हजार रुपये प्रतिक्विंटल दराने नाईलाजाने व्यापाऱ्यांना तूर विकावी लागली. त्यामुळे तूर उत्पादकांना मोठा तडाखा बसला. आता हळद उत्पादक शेतकऱ्यांनासुध्दा तोच अनुभव येतो आहे. गेल्यावर्षी सरासरी 14 हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा भाव हळदीस होता. यावर्षी दुर्दैव म्हणजे 9 हजार ते 9 हजार 500 या दरम्यान हळदीचे भाव स्थिरावले आहेत.