रेवस करंजा खाडीवर पूल उभारण्याच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून अलिबाग तालुक्यातील रेवस ते उरण तालुक्यातील करंजादरम्यानच्या दोन किलोमीटर लांबीच्या पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी 2 हजार 963 कोटी रुपयांचा ठेका ‘अॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनीला देण्यात आला असून कंपनी पुढील 3 वर्षांत हे काम पूर्ण करणार आहे. दरम्यान खाडी पूल उभारण्यास झालेल्या विलंबामुळे 44 वर्षांत खाडीपुलाचा खर्च 2 हजार 663 कोटींनी वाढला आहे.
अलिबाग आणि उरण या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या खाडीपुलाची चर्चा 1970 पासूनच सुरू झाली होती. त्यानंतर 1980 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी या प्रकल्पासाठी 300 कोटी रुपयांची तरतूदही केली होती. काही कामेही सुरू झाली होती; परंतु बॅ. अंतुले मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर 1982 मध्ये लगेचच हा प्रकल्प गुंडाळण्यात आला. त्यानंतर रेवस-करंजा खाडी पूल हे स्वप्नच राहिले. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास रेवस रेड्डी सागरी महामार्ग दृष्टिक्षेपात येणार आहे.
रेवस ते करंजा हा पूल दोन किमी लांबीचा असून 4 लेन पूल उभारण्यात येणार आहे. या पुलामुळे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ते अलिबागदरम्यानचे अंतर 25 किलोमीटरने कमी होणार आहे. या पुलावरून तब्बल 80 किलोमीटर प्रतितास वेगाने वाहने धावतील, असे डिझाईन विकसित करण्यात येत आहे. पुलावर दोन्ही बाजूला 1.5 मीटर रुंद पादचारी पदपथ समाविष्ट करण्यात आले आहेत. पुलाला जोडण्यासाठी करंजा येथे 5.13 किलोमीटर लांबीचा; तर रेवस येथे 1.71 किलोमीटर लांबीचा रस्ता बांधण्यात येणार आहे.
रो रो सेवेची कामे रखडली
रेवस-करंजादरम्यान रो रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी करंजा व रेवस येथे रो रो अनुषंगाने 2018 पासून कामे हाती घेण्यात आली आहेत. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या माध्यमातून जेट्टीचे काम करण्यात येत आहे. यातील करंजा बंदरावरील जेट्टीचे काम पूर्ण होऊन पाच वर्षे झाली आहेत. यातील जेट्टीची दुरवस्था होऊ लागली आहे. मात्र या जलमार्गावरील रेवस जेट्टीचे काम अनेक कारणांनी रखडले आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी नव्याने निविदा मागवण्यात आल्या आहेत. रेवस जेट्टी येथील कामाचा खर्च 25 कोटींवरून 30 कोटींवर पोहोचलेला आहे. केंद्राच्या सागरमाला योजनेंतर्गत रेवस व करंजा या ठिकाणी जेट्टी उभारणीपासून रस्ता, टर्मिनल, पार्किंग सेवा अशा अनेक सुविधा निर्माण केल्या जात आहेत.