पोतेवाडीत तीव्र पाणीटंचाई; सरपंचाची शेती हिरवीगार, जामखेड तालुक्यात ‘जलजीवन मिशन’ कामामध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार

तालुक्यात ‘जलजीवन मिशन ‘च्या कामामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. यातच पोतेवाडी येथे अजब प्रकार उघडकीस आला आहे. गावात तीव्र पाणीटंचाई असतानाही पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीवर तीन विद्युत मोटारींच्या साहाय्याने सरपंचाच्या शेतीला पाणीपुरवठा होत आहे. सरपंचाची शेती हिरवीगार, तर गावात तीव्र पाणीटंचाई आहे. विशेष म्हणजे, ‘जलजीवन’ पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीजवळच ‘मनरेगा’ योजनेअंतर्गत स्वतःच्या विहिरीचे काम सुरू आहे. तेही अगदी पाणीपुरवठा योजनेपासून 50 फूट अंतरावर !

तालुक्यातील पोतेवाडी येथे ‘जलजीवन’च्या कामामध्ये मोठ्या प्रमाणावर सावळागोंधळ आहे. गावाच्या पाणीपुरवठा योजनेसाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीतून पाणीपुरवठ्यासाठी नान्नज हद्दीत विहीर व तेथून पाइपलाइन करण्यात आली आहे. मात्र, अद्यापि हस्तांतरण बाकी आहे. सध्या गावात तीव्र पाणीटंचाई आहे. काही ठिकाणी खासगी टैंकर आहेत. पाणीटंचाई असताना सरपंच प्रवीण पोते यांनी विहिरीतून स्वतःच्या शेतातील पिकाला पाणी सुरू केले आहे. तसेच या विहिरीच्या 50 फूट अंतरावर स्वतःच्या शासकीय योजनेतून घेतलेल्या विहिरीचे काम सुरू आहे. शासकीय योजनेतून मिळालेल्या विहिरीला इतक्या जवळ कशी मंजुरी दिली, याकडे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.

याबाबत गावातील गणेश सगळे यांनी अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘सरपंच प्रवीण शिवाजी पोते यांनी गावास पाणीपुरवठा करण्यासाठी नुकत्याच आलेल्या ‘जलजीवन मिशन’ योजनेअंतर्गत पाइपलाइनचे पाणी मुख्य पाइपलाइनला जोडून स्वतःच्या शेततळ्यामध्ये सोडून गैरवापर करीत आहेत. यामुळे नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. शासकीय विहिरीजवळच अनुदान घेऊन 50 फूट अंतरावर स्वतःची विहीर खोदली असून, संबंधित विहिरीची व संपूर्ण जलजीवन मिशन योजनेची चौकशी करावी. सरपंच प्रवीण पोते यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला आहे. त्यामुळे ते ग्रामपंचायत अधिनियम-1958 चे कलम 39 नुसार अपात्र ठरतात.