मुंबईतील रस्त्यांच्या भ्रष्टाचाराला ‘एसंशिं’ जबाबदार, आदित्य ठाकरे यांनी केली मुंबईतील रस्त्यांच्या कामाची पाहणी

मुंबईत वरळी कोळीवाडय़ासह सर्व रस्त्यांची कामे ही निकृष्ट दर्जाची झाली असून त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. ही कामे पाहिल्यावर कदाचित महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करेल, पण या रस्त्यांच्या कामांमधील भ्रष्टाचाराला जबाबदार असलेल्या ‘एसंशिं’वर कारवाई कधी करणार याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे, असा सवाल शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला.

मुंबईत महापालिकेच्या रस्ते विभागाकडून वरळी कोळीवाडय़ाच्या मुख्य रस्त्यांच्या कामकाजाची पाहणी आदित्य ठाकरे यांनी केली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रस्त्याच्या काँक्रीटीकरणात घोटाळा झालाय हे गेल्या दोन वर्षांपासून सांगतोय. आता लोकच आणि सगळेच आमदार बोलायला लागले आहेत. मध्यंतरी एसंशिंने रस्त्याच्या पाहणीचे नाटक केले. पण रस्ते पाहिले तर आपण अक्षरशः चंद्रावर उभे आहोत असे वाटतेय, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावत रस्त्यांची कामे अत्यंत निपृष्ट दर्जाची झाली असल्याचे सांगितले. यावेळी विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर, भाऊ कोळी यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

काँक्रिटीकरणात पडल्या भेगा

मुंबईत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची असून काही ठिकाणी काँक्रिटीकरणात भेगा पडल्या आहेत. मोठ्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाबरोबर गरज नसतानाही लहान रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे करण्यात आली आहेत. आता पावसाळा जवळ आला आहे. काँक्रिटीकरणाला भेगा पडल्या असून काँक्रिटीकरण उडू लागले आहे. हे काँक्रिटचे तुकडे पर्जन्यवाहिनी, गटारे यांच्यात जाऊन बसले तर त्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर मोठा बाका प्रसंग निर्माण होईल. पालिका आयुक्तांनी याची दखल घेऊन बैठक घ्यावी आणि जिथे जिथे काँक्रिटीकरणाची कामे झाली आहेत तिथे तिथे याबाबत योग्य उपाययोजना कराव्यात, असा सल्ला आदित्य ठाकरे यांनी दिला.

  • नालेसफाईची अत्यंत धीम्या गतीने सुरू आहेत. मिठी नदीची अवस्था खूपच बेकार आहे. अनेक ठिकाणी गाळ काढण्यात आलेला नाही. जो काढला आहे तो रस्त्याच्या कडेला तसाच टाकून ठेवला आहे. ही कोणत्या पावसाळ्याची तयारी करत आहेत, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

चंद्र बघून गावचा मुक्काम वाढवला

मला वाटतं, त्यांनी गावातील मुक्काम वाढवला आहे, तापमान वाढलं आहे, मात्र चंद्र कुठे आहे? ते बघून अजून दोन दिवस ते गावात काढणार आहेत, असा टोला यावेळी आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.