
आदिवासी विभागातील 114 कोटींच्या गणवेश खरेदीत भ्रष्टाचार प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
विधान परिषदेत सदस्य एकनाथ खडसे आणि चंद्रकांत रघुवंशी यांनी विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना गणवेश खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता तसेच आरोग्य, आदिवासी, परिवहन, पीडब्ल्यूडी विभागात सुरू असलेल्या भ्रष्टाचारावरून सरकारला जाब विचारला. ते म्हणाले, आदिवासी विकास विभागात मागील महिन्यात 114 कोटींचे गणवेश खरेदी झाली. ही सगळी खरेदी आवश्यक नसताना झाली. एक कोटीपेक्षा अधिक रकमेची खरेदी दर करारावर न करता रीतसर निविदा प्रक्रिया राबवूनच केली जावी. या सरकारच्या आदेशाला फाटा देत आदिवासी विकास विभागाच्या वतीने तब्बल 114 कोटींची गणवेश आणि नाइट ड्रेस खरेदी दर करारावर करण्यात आले. इतकेच नव्हे तर त्यातील सुमारे 72 कोटींची देयके पुरवठादार संस्थेला अदाही करण्यात आली. या खरेदीतील भ्रष्टाचारप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी खडसे यांनी केली.