पावसाळापूर्व नालेसफाईत भ्रष्टाचार झाल्यामुळेच पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली असा आरोप करत याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करा, अशी मागणी विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज केली. हजारो कोटींचा अॅम्ब्युलन्स खरेदी घोटाळा, वरळीतील हिट अॅण्ड रन प्रकरणावरूनही त्यांनी सरकारला धारेवर धरले.
सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या अनेक भागांमध्ये पाणी साचून नागरिकांचे प्रचंड हाल झाले. विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे तो मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. महापालिकेच्या निवडणुका न घेतल्या गेल्यामुळे मुंबईत लोकप्रतिनिधी नाहीत, त्याचा फटका मुंबईला पावसात बसला असल्याचे ते म्हणाले. नालेसफाईसाठी खर्च केलेले शेकडो कोटी रुपये पाण्यात गेले असेही ते म्हणाले. मुंबईच्या वरळीमध्ये हिट अँड रनची घटना घडली. त्यातील आरोपीचा पिता हा सत्ताधारी पक्षाचा पदाधिकारी असल्याने चौकशीत राजकीय हस्तक्षेप होत आहे, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला.
अॅम्ब्युलन्स घोटाळा; एसआयटी चौकशी करा
राज्य सरकारने तीन हजार कोटी रुपयांच्या अॅम्ब्युलन्सची रक्कम टेंडर फुगवून दहा हजार कोटींवर नेली. त्यात 30 टक्के कमिशन घेतले गेले. हा अॅम्ब्युलन्स घोटाळा कोणाच्या पुत्रासाठी केला जातोय, या घोटाळ्यात किती नेत्यांचे खिसे गरम झालेत, असा सवाल करत वडेट्टीवार यांनी या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली.
गुजरातच्या जीएसटी कमिशनरची साताऱयात सहाशे एकर जमीन
मुख्यमंत्र्यांच्या सातारा जिह्यात दुर्गम कांदाटी खोऱयातील सहाशे चाळीस एकर जमीन गुजरातच्या जीएसटी कमिशनरने अल्पदरात खरेदी केल्याचे प्रकरणही वडेट्टीवार यांनी सभागृहात मांडले. या खरेदीमध्ये सर्व नियम धाब्यावर बसवले गेले आहेत, असे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले आणि संबंधित अधिकाऱयावर काय कारवाई करणार, असा सवाल सरकारला केला.
विरार-अलिबाग कॉरीडॉर भूसंपादनात मोठा घोटाळा
विरार-अलिबाग कॉरीडॉर भूसंपादनात महसूल अधिकारी आणि दलालांकडून मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करून त्याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली. या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली.