
रामनगर सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचार प्रकरणात ईडीची नोटीस येताच मिंधे गटात पळून गेलेले अर्जुन खोतकर यांच्या विरोधात मोठा लढा उभारण्याचे जाहीर करतानाच खोतकरांनी जिथे बोट लावले तिथे माती केली, असा स्पष्ट आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. खोतकर यांच्या भ्रष्टाचाराच्या फायली घेऊन लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचेही दमानिया यांनी सांगितले.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज जालना सहकारी साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांशी संवाद साधला. या वेळी अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या झालेल्या फसगतीची माहिती दिली. कारखान्यातून छत्रपती संभाजीनगर – नांदेड या समृद्धी महामार्गाला जोडणारा महामार्ग नेण्याचा घालण्यात आलेला घाट आणि त्यात करण्यात आलेला भ्रष्टाचार, कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांची थकलेली देणी, बाजार समिती, खरेदी-विक्री पेंद्रात झालेल्या कोटय़वधींच्या गैरव्यवहाराची माहिती या वेळी शेतकऱ्यांनी अंजली दमानिया यांना दिली. सभासद शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत बोलताना कारखान्याचे मालक अर्जुन खोतकर यांच्या भ्रष्टाचाराविरोधात एप्रिलअखेरपर्यंत मोठा लढा उभारणार असल्याचे सांगितले.
ईडीची कारवाई होण्यासाठी याचिका करणार
कारखाना गैरव्यवहार प्रकरणात ईडीने अर्जुन खोतकर यांना नोटीस बजावली होती. नोटीस मिळताच गर्भगळित झालेले खोतकर कुटुंबकबिला वाचवण्यासाठी मिंध्यांकडे पळाले. ईडीची कारवाई शेतकऱ्यांना न्याय देणारी असली पाहिजे. त्यामुळे या प्रकरणात हस्तक्षेप याचिका दाखल करणार असल्याची माहिती अंजली दमानिया यांनी दिली.