
नगर जिल्ह्यातील पोलीस स्थानिक गुन्हे शाखा (LCB) विभागातील कारभार भ्रष्ट असून सरकारने त्यात काय लक्ष घालावे, अन्यथा मी उपोषणाला बसेन, असा इशारा खासदार निलेश लंके यांनी राज्य सरकारला दिला आहे. लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या निवेदनात हा इशारा दिला आहे.
खासदार निलेश लंके निवेदनात म्हटले आहे की, राज्यामध्ये नगर जिल्ह्याची परंपरा आहे. ही संताची पावनभूमी म्हणून ओळखली जाते. मात्र, काही वर्षांपासून जिल्ह्यातील जनतेचे रक्षक असणारे पोलीस खात्यातील स्थानिक गुन्हे शाखेतील पी.आय. दिनेश आहेर, पी.एस.आय. सोपान गोरे व इतर कर्मचारी हे सर्वजण राजरोसपणे हप्ते घेत आहेत. हप्ते गोळा करण्यासाठी रविंद्र आबासाहेब कर्डिले व त्यांचे गुन्हे शाखा विभागातील सहकारी शहाजी आढाव, अमोल भोईटे, रणजित जाधव, रोहित मिसाळ, विजय ठोंबरे, शिवाजी ढाकणे, सचिन आडबल, मनोज गोसावी, बापु फोलाणे हे मदत करीत आहेत. रविंद्र कर्डिले याची शिर्डी येथील साई मंदीर सुरक्षा विभागात नेमणूक असतानाही तात्पुरत्या स्वरुपात सायबर सेल नगर येथे बदली करण्यात आली आहे. तसेच स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा (LCB) व सायबर सेल या दोन आस्थापना वेगवेगळ्या आहेत. हे दोन विभाग स्वतंत्र असतानाही या दोन्ही शाखेचा कार्यभार पी.आय. दिनेश आहेर यांच्याकडे आहे. स्थानिक गुन्हे शाखेत अनेक गुन्हे प्रलंबीत आहेत. हे निश्चीतच संशयास्पद असून पी.आय. दिनेश आहेर यांच्याकडे दोन्ही शाखेचा कार्यभार फक्त स्वार्थासाठी आहे, असे लंके यांनी म्हटले आहे.
नगर जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून महाराष्ट्रात सर्वात जास्त गुन्हेगारी असणारा जिल्हा म्हणून नगर ओळखला जात आहे. तसेच बीफ, मटन, ऑनलाईन क्लब, वाळु व्यवसाय, गुटखा व्यवसाय, दारु व्यवसाय, गांजा व्यवसाय, चदंनतस्कर व्यवसाय, मटका, बिंगो हे सर्व व्यवसाय पोलिसांच्या आशीर्वाद व आश्रयाखाली मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या प्रकरणाचा मास्टर माईंड रविंद्र आबासाहेब कर्डिले असून त्यांच्यावर काही वर्षापूर्वी LCB विभागात असताना ACB खात्याने कारवाई केली आहे. हे प्रकरण जिल्हा न्यायालय नगर येथे प्रलंबीत आहे. तसेच नगर शहरातील एका गुन्ह्यामध्ये CID चौकशी देखील चालु आहे. इतर गुन्हे ही त्याच्यावर आहेत. ते जिल्ह्यातील इतर पोलीसावर दबावतंत्र वापरतो तरीही आशा कर्मचाऱ्यांवर पोलीस खात्याकडून कुठलीच कारवाई होत नाही, हे निश्चीतच खेदजनक आहे, असेही लंके यांनी म्हटले आहे.
हे सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी सामान्य जनतेस वेठीस धरत आहे. जिल्ह्यातील सुर्वणकार व्यवसाय करणारे सराफ लोकास दमदाटी करुन खोटे गुन्हयामध्ये अडकवू, असे धमकावतात. जिल्ह्यामध्ये इतर सर्व कारणामुळे गुन्हेगारी वाढतच चालली आहे. नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. अनेकाचे संसार उद्धवस्त झाले आहे. अशा तक्रारी वारंवार माझ्याकडे स्थानिक नागरिकांनी केल्या आहेत व करत आहेत. तरी या प्रकरणी नमुद अधिकारी, कर्मचारी यांच्यावर विशेष दर्जा असणारे अधिकारी यांच्या मार्फत चौकशी करुन संबधित दोषीवर सात दिवसात कारवाई करण्यासाठी आपल्या स्तरावरुन आदेश द्यावे. तसेच जिल्ह्यातील सर्व अवैध व्यवसाय बंद करण्यात यावेत.जनतेचा प्रतिनिधी या कारणाने जिल्हा पोलीस अधीक्षक, नगर, कार्यालयासमोर सर्व सबळ पुराव्यासह उपोषणस बसणार आहे, याची नोंद घ्यावी. असे खासदार लंके यांनी म्हटले आहे.