भ्रष्ट सत्तार, राठोड, गुलाबराव, तानाजी सावंतांसह केसरकरांची दांडी गुल होणार; मिंधे गट आणि भाजपमधील आमदारांच्याही तक्रारी असल्याने मंत्रीपद मिळणे कठीण

महायुती सरकारमध्ये मंत्रीपदांवरून धुसफुस कायम आहे. अधिकच्या मंत्रीपदांसाठी अडवणूक करणाऱया मिंधे गटाबद्दल भारतीय जनता पक्षासह अजित पवार गटातील आमदारही नाराजी व्यक्त करत आहेत. इतकेच नव्हे तर मिंधे गटातच आपापसात यावरून वाद निर्माण झाले आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या आणि आपल्याच आमदारांची कामे टाळणाऱया मंत्र्यांना पुन्हा मंत्रीपद देऊ नका असा सूर मिंधे गटासह भाजप आमदारांमध्येही उमटत आहे. त्यामुळे या पाच जणांची दांडी गुल होण्याची शक्यता आहे.

मिंधे गटाकडे 57 आमदार असल्याने हायप्रोफाईल खात्यांसह अधिकची मंत्रीपदेही मिळावीत यासाठी एकनाथ शिंदेंची धडपड सुरू आहे. परंतु अनेक मंत्र्यांबद्दल मिंधे गटातील आमदारांचीच तक्रार असल्याने त्या मंत्र्यांना पुन्हा मंत्रीपद देण्यास भाजपकडूनही विरोध होत आहे. त्यात अब्दुल सत्तार, संजय राठोड, तानाजी सावंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे यांच्यासह केसरकर यांचा समावेश आहे. त्यांनी मंत्रीपदावर असताना आपली कामे जाणीवपूर्वक रखडवली, असा आमदारांचा आरोप आहे.
कोणावर, काय आरोप

  • अब्दुल सत्तार – महिलांबद्दल जाहीरपणे आक्षेपार्ह वक्तव्ये करणे, जमिनी हडपणे.
  • तानाजी सावंत – आरोग्यमंत्री पदाचा गैरवापर करून टेंडरशिवाय शेकडो कोटींची पंत्राटे देणे. अॅम्ब्युलन्स खरेदीत भ्रष्टाचार.
  • संजय राठोड – पूजा चव्हाणवरील अत्याचार व आत्महत्या प्रकरण. अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱयांना दमदाटी.
  • गुलाबराव पाटील – भ्रष्टाचार
  • दीपक केसरकर – शिक्षणमंत्री असताना मिंधे गट आणि भाजपमधील आमदारांच्या फायली
    रखडवणे.
  • दादा भुसे – मिंधे गटातील आमदारांची कामे जाणीवपूर्वक रखडवणे. मालेगावातील मनी लॉण्डरिंगप्रकरणी संशयाची सुई. मिंधे गटाचे आमदार महेंद्र थोरवे हे पावसाळी अधिवेशनात विधान भवनाच्या लॉबीमध्येच भुसे यांच्या अंगावर धावून गेले होते.

भाजपश्रेष्ठीचीही नाराजी

भाजपश्रेष्ठीनाही भ्रष्टाचार आणि चारित्र्यासंबंधी आरोप असलेल्या व्यक्ती मंत्रिमंडळात नको आहेत, असे भाजपमधील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे वादग्रस्त मंत्र्यांची पुन्हा मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता कमीच आहे. तरीही मिंधे गट भाजपवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज चर्चेसाठी दिल्ली गाठावी लागल्याचे सांगितले जाते.