अभिप्राय – कॉर्पोरेट यशोमंत्र

>>एम. के. पवार

जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवलेल्या ज्या भारतीय उद्योजकांची नावे आदराने घेतली जातात, त्यामध्ये टाटा, बिर्ला, मित्तल, महिंद्रा यांच्यासह आणखी एक नाव ठळकपणे दिसून येते ते म्हणजे मुकेश अंबानी! मुकेश अंबानी यांच्या जीवनावर लिहिलेल्या ‘कॉर्पोरेट गुरू मुकेश अंबानी’ या पुस्तकात आज जगप्रसिद्ध असलेल्या रिलायन्स या उद्योग समूहाची जडणघडण घडवणाऱया मुकेश अंबानी यांच्या कार्यकर्तृत्वाचा विस्तार आणि त्याचबरोबर व्यक्ती म्हणून त्यांची वैशिष्टय़े मांडण्यात आली आहेत. अल्पशिक्षित कै. धीरूभाई अंबानी या एका उद्योजकाने आपल्या जीवनक्रमाची सुरुवात अगदी युवावस्थेत एडन (येमेन) इथे जाऊन अगदी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याच्या कामातून केली. पुढे एडनमधील सामाजिक स्थिती बिघडल्यामुळे ते कुटुंब मुंबईत आले आणि एका चाळीतील खोलीत संसार थाटून त्यांनी पुढे नावारूपाला आणलेल्या रिलायन्स उद्योगाचा श्रीगणेशा केला. मुकेश हे यूएसएमध्ये उच्चशिक्षण घेण्यासाठी गेले होते, पण ते पूर्ण होण्याच्या आधीच वडिलांनी त्यांना परत बोलावून आपल्या उद्योगात सहभागी करून घेऊन अगदी तरुण वयातच त्यांना रिलायन्स कंपनीचे संचालक केले आणि पाताळगंगा इथल्या रिफायनरीचे काम त्यांच्याकडे सोपवले. या सर्व घडामोडींचा जवळ जवळ पाच दशकांचा आढावा या पुस्तकात घेतला आहे. त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांचेही विविध क्षेत्रांतील कार्य आणि एकूणच सर्व अंबानी कुटुंबाचा परिचय, भावी योजनाही 11 प्रकरणांतून मांडण्यात आल्या आहेत. हे सगळे त्यांनी कसे घडवून आणले, कोणती व्यवस्थापन सूत्रे वापरली, त्यांच्या यशाच्या कार्यपद्धती काय आणि तरुण पिढीला ते कोणता संदेश देऊ इच्छितात, त्यांचे उद्योग आणि व्यवस्थापनविषयक विचार पुस्तकात आहेत. उद्योजकाचे चरित्र जाणून घेताना त्यांचे वैयक्तिक आयुष्य, व्यावसायिक कार्यपद्धती व त्यांचे यशोमंत्र जाणून घेण्यास लोक उत्सुक असतात. या गोष्टींचा समतोल साधल्यास चरित्र वाचनीय होते. आपल्या ओघवत्या शैलीत लेखकाने याचा उत्तम मेळ घातला आहे. समयसूचकता व गुणवत्ता या दोन गोष्टींना बांधील असणाऱया प्रत्येकासाठी हे चरित्र प्रेरणादायी ठरेल.

कॉर्पोरेट गुरू मुकेश अंबानी
प्रकाशन ः साकेत प्रकाशन लेखक ः डॉ. सुधीर राशिंगकर
पृष्ठ संख्या ः 151 किंमत ः 200 रु.