कोपाही अर्जेंटिनाचाच; कोपा अमेरिकावर सोळाव्यांदा कब्जा

घडाळ्याचे काटे गोलशून्य बरोबरीच्या दिशेने सरकत असताना लॉटारो मार्टिनेझने 30 मिनीटांच्या जादा वेळेत केलेल्या गोलने जगज्जेत्या अर्जेंटिनाला कोपा अमेरिकाचाही मान मिळवून दिला. अर्जेंटिनाने कोपा अमेरिकाच्या अंतिम लढतीत कोलंबियाचा 1-0 ने पराभव केला. आज अर्जेंटिनाने स्पेनने 2008 आणि 2012 मध्ये युरो कप जिंकताना 2010 साली फिफा वर्ल्ड कपही जिंकण्याचा जो दुर्मिळ पराक्रम केला होता त्याची बरोबरी साधली. अर्जेंटिनाने 2021 मध्ये ब्राझिलचा पराभव केला होता तर आता कोलंबियाला नमवत आपले कोपा अमेरिकाचे जेतेपद राखले.

आज अर्जेंटिनाचा झंझावात मैदानात दिसत असला कोलंबियानेही त्यांना चांगलेच सतावले. दोन्ही संघ गोलांचे खाते उघडण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत होते, पण यश कुणालाही स्पर्श करू देत नव्हता. पहिला हाफ गोलशून्य संपल्यानंतर दुसर्या हाफमध्येही तोच खेळ कायम होता. त्यातच लिओनल मेस्सीला झालेल्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर जावे लागेल. दुसरा हाफही गोलशून्य संपल्यानंतर सामना जादा वेळेत सुरू झाला आणि तेव्हा मार्टिनेझने कोलंबियन गोलरक्षक पॅमिलो वर्गासला चकवत केलेला गोल निर्णायक ठरला.

अर्जेंटिनाची दुर्मिळ बरोबरी
काल स्पेननेही युरो कप जिंकले आणि कालच अर्जेंटिनानेही कोपा अमेरिकावर आपले नाव कोरले. स्पेनने दशकापूर्वी 2008 आणि 2012 साली युरो कप जिंकताना 2010 साली आपले पहिलेवहिले जगज्जेतेपदही पटकावले होते. त्याच दुर्मिळ पराक्रमाची बरोबरी अर्जेंटिनाने कोपा अमेरिका जिंकत केली. त्यांनी 2021 मध्ये कोपा जिंकला होता आणि मग 2022 मध्ये जगज्जेतेपद पटकावले. आणि आता कोपा अमेरिका राखताना स्पेनपराक्रमाची बरोबरी साधली. फुटबॉलच्या इतिहासात असा पराक्रम केवळ या दोन संघांनाच शक्य झाला आहे.

अर्जेंटिनाचे 16 वे कोपा अमेरिका जेतेपद
स्पेनने युरो कप चौथ्यांदा जिंकण्याचा विश्वविक्रम रचला तर अर्जेंटिनाने 16 व्यांदा कोपा अमेरिका जिंकला आणि उरुग्वेचा 15 जेतेपदांचा विक्रम मोडीत काढला. अर्जेंटिनाने गेल्या तीन वर्षात चार मोठी जेतेपदे जिंकण्याचा इतिहास रचला.