आचारसंहितेपूर्वी कर्मचाऱ्यांना बोनस द्या! समन्वय समितीची मागणी

राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणूक जाहीर होऊन आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेचे हजारो कर्मचारी दिवाळीसाठी मिळणाऱ्या सानुग्रह अनुदानापासून (बोनस) वंचित राहण्याची भीती आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना विधानसभा आचारसंहिता लागण्याआधी सानुग्रह अनुदान (बोनस) द्या, अशी मागणी मुंबई महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीने पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे.

मुंबई महापालिकेतील कर्मचारी-अधिकाऱ्यांना एकूण वार्षिक वित्तलब्धीच्या किमान 20 टक्के सानुग्रह अनुदान म्हणून देण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन पालिका आयुक्तांना देण्यात आले. यावेळी समन्वय समितीचे बाबा कदम, वामन कविस्कर, अशोक जाधव, प्रकाश देवदास, दिवाकर दळवी, सत्यवान जावकर, के. पी. नाईक, साईनाथ राजाध्यक्ष, बा. शि. साळवी, शरद सिंह इत्यादी समन्वय समितीचे नेते हजर होते.

बोनसमध्ये भरघोस वाढ करा

सदर भेटीदरम्यान समन्वय समितीने आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले की, या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पात कर्मचाऱ्यांसाठी 237 कोटींच्या रकमेची तरतूद करण्यात आलेली आहे. शिवाय दरवर्षी कर्मचाऱ्यांना पहिल्या वर्षापेक्षा वाढीव बोनस देण्याची प्रथा असून या वर्षीही बोनसमध्ये भरघोस अशी वाढ करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी आयुक्तांनी लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.