शिवरायांना अभिवादन करण्यावरून वाद; राहुल गांधींच्या ‘श्रद्धांजली’ शब्दावरून भाजपचा  गदारोळ; मोदींच्या ‘होमेज’वर मात्र चिडीचूप

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवरायांना अभिवादन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोठी चूक केली. राहुल गांधी यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये जयंतीच्या दिवशी ‘श्रद्धांजली’ असा शब्द वापरला. यास भाजपने आक्षेप घेत राहुल गांधी आणि काँग्रेसने माफी मागण्याची मागणी करत गदारोळ सुरू केला आहे. त्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवजयंतीनिमित्त केलेल्या इंग्रजी पोस्टमध्ये ‘होमेज’ असा शब्द वापरला. त्यावर मात्र मौन धारण केल्याने शिवप्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रासह देशभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवरायांना अभिवादन करण्यात आले. राजकारणी आणि सेलिब्रिटी यांनी सोशल मीडियावरून जयंतीनिमित्त शुभेच्छा संदेश देत शिवरायांना अभिवादन केले. राहुल गांधी यांनी जयंतीनिमित्त हिंदीतून केलेली पोस्ट मात्र जयंतीच्या दिवशी ‘श्रद्धांजली’ अर्पण केल्याने वादात अडकली आहे. राहुल गांधी यांच्या पोस्टवर भाजपासह अनेकांनी आक्षेप घेत टीका केली आहे. राहुल गांधी हे महाराष्ट्र आणि देशातील महापुरुषांचा कळत-नकळत अनादर व्यक्त करत असतात. यातलाच हा प्रकार आहे. त्यांनी ही पोस्ट मागे घ्यावी अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे.

हा भाजपचा दुटप्पीपणा – विजय वडेट्टीवार

हा भाजपचा दुटप्पीपणा आहे. पंतप्रधानांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून, पीएमओच्या हँडलवरून पंतप्रधानांनीदेखील श्रद्धांजलीच वाहिली आहे. ते जरा डोळे उघडून पाहावे, असे कॉँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.

शिवरायांच्या अवमानाबद्दल भाजपनेच माफी मागावी – लोंढे

भाजप नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट नीट पहावे आणि नंतर बोलावे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान जर कोणी केला असेल तर भाजपनेच वारंवार केला असून त्यांनीच माफी मागावी, असे  काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलेला मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळला, मोदींच्या हस्ते जलपूजन झालेल्या अरबी समुद्रातील स्मारकाची वीटही रचलेली नाही त्याबद्दल भाजप कधी माफी मागणार, असा सवाल त्यांनी केला.

नेत्यांनी भाषेची आणि परंपरेची जाण ठेवावी – संभाजीराजे

जयंतीच्या दिवशी कोणी श्रद्धांजली अर्पण करते का? जयंती हा साजरा करण्याचा, प्रेरणा घेण्याचा दिवस असतो. शिवजयंती ही महाराजांच्या विचारांची पुनर्स्मृती करण्याची संधी असते, श्रद्धांजली नव्हे. त्यामुळे सार्वजनिक नेत्यांनी भाषेची आणि परंपरांची योग्य जाण ठेवून विचारपूर्वक शब्दप्रयोग करावा, असे संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.

‘ध’चा मा करून राजकारण करू नका – हर्षवर्धन सपकाळ

विरोधकांची राजकारणाचा हा खेळ काही नवा नाही. पंडित नेहरू यांच्यासंदर्भातदेखील अशाच प्रकारचे काम करण्यात आले होते. राहुल गांधींच्या ट्विटचे गुगल ट्रान्सलेट केल्यास श्रद्धांजली शब्द येतो. ही एक तांत्रिक चूक, पण विरोधक विनाकारण ‘ध’चा मा करून घाणेरडे राजकारण करू नये, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.