नेटफ्लिक्सवरील ‘आयसी 814 – द कंदहार हायजॅक’ या नव्या वेब सीरिजमुळे वाद निर्माण झालाय. वेब सीरिजमध्ये दहशतवाद्यांच्या खऱ्या नावांऐवजी ‘भोला’ आणि ‘शंकर’ ही नावे वापरली आहेत. यावरून गदारोळ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विमान अपहरणाच्या घटनेतून वाचलेल्या पूजा कटारिया यांनी सत्य काय ते सांगितले आहे.
पूजा कटारिया म्हणाल्या, त्या वेळी अतिरेक्यांना विमानात याच नावाने हाक मारली जात होती. भोला, शंकर, बर्गर, डॉक्टर या नावाने ते एकमेकांना हाक मारत होते. वेब सीरिजमध्ये जे दाखवलेय ते सत्य आहे. तसेच ही घटना हाताळताना भाजप सरकार अपयशी ठरले असे स्पष्ट मत कटारिया यांनी व्यक्त केले.
25 वर्षांपूर्वीची विमान अपहरणाची घटना पुन्हा चर्चेत आली आहे. ‘आयसी 814 – द कंदहार हायजॅक’ वेब सीरिज 24 डिसेंबर 1999 रोजी झालेल्या आयसी 814 या विमान अपहरणाच्या घटनेवर आहे. विमानाने काठमांडूहून दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी उड्डाण केले होते. परंतु मध्येच दहशतवाद्यांनी त्याचे अपहरण केले. या घटनेनंतर सात दिवसांनी म्हणजे 31 डिसेंबर 1999 रोजी सरकारने अतिरेकी मसूद अजहर याच्यासह तीन अतिरेक्यांना सोडल्यानंतर विमानातील प्रवाशांची सुटका करण्यात आली होती.
घटनेच्या वेळी राकेश आणि पूजा कटारिया हे तरुण जोडपे होते. नेपाळमधून हनिमूनहून घरी परतत होते. नेटफ्लिक्स मालिकेत अपहरणकर्त्यांसाठी वापरलेली सांकेतिक नावे खरी असल्याचे कटारियाने सांगितले.
बर्गर खूप फ्रेंडली
त्यातील बर्गर नावाचा दहशतवादी फ्रेंडली होता. प्रवासी घाबरले होते. प्रवाशांना पॅनिक अटॅक येत होता. म्हणून बर्गर गाणी आणि अंताक्षरी खेळायला सांगायचा. एक दहशतवादी इस्लाम धर्म चांगला आहे, त्याचा स्वीकारा करा, असे प्रवचन द्यायचा.