![aligarh-muslim-university aligarh-muslim-university](https://www.saamana.com/wp-content/uploads/2018/04/aligarh-muslim-university-696x447.gif)
अलिगढ मुस्लिम विद्यापीठात (एएमयू) रविवारच्या दुपारच्या जेवणात चिकन बिर्याणीऐवजी बीफ बिर्याणी दिली जाईल, अशी नोटीस लावण्यात आल्याने वाद निर्माण झाला. सर शाह सुलेमान हॉलमध्ये विद्यार्थ्यांना ही नोटीस आढळून आली. ‘रविवारचा लंच मेन्यू बदलला असून मागणीनुसार चिकन बिर्याणीऐवजी बीफ बिर्याणी दिली जाईल’, असे संबंधित नोटीसमध्ये लिहिले होते. सोशल मीडियावर नोटीस व्हायरल होताच नोटीस लिहिताना चूक झाली असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले. तसेच नोटीस जारी करण्यास जबाबदार असलेल्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
टायपिंग करताना चूक झाली असून ही नोटीस ताबडतोब मागे घेण्यात आली आहे. कारण त्यावर कोणतीही अधिपृत स्वाक्षरी नव्हती. याप्रकरणी दोन वरिष्ठ विद्यार्थ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. विद्यापीठाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी आम्ही हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेत आहोत, असे स्पष्टीकरण विद्यापीठ प्रशासनाने निवेदनाद्वारे दिले.