दिल्लीतील ‘तो’ सत्कार साहित्य महामंडळाच्या परवानगीशिवाय

यंदाचे 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर ‘सरहद’ या संस्थेकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याअंतर्गत दिल्लीत मंगळवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मात्र हा कार्यक्रम साहित्य महामंडळाच्या परवानगीशिवाय झाल्याचे समजतंय. याबद्दल साहित्य वर्तुळातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या 21 ते 23 फेब्रुवारीदरम्यान राजधानी दिल्लीत होत आहे. या पार्श्वभूमीवर सरहद या आयोजक संस्थेकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन होतंय. या कार्यक्रमांमध्ये राजकीय नेत्यांची उपस्थिती लक्षणीय आहे. त्यावरून साहित्यिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. साहित्य संमेलन महामंडळाच्या नियंत्रणात राहिलेले नाही, अशी टीका होत आहे. साहित्य महामंडळाच्या घटनात्मक तरतुदींनुसार, संमेलन वा संमेलनपूर्व कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आयोजक संस्थेने महामंडळाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे, परंतु सरहद संस्थेने तशी परवानगी घेतली नव्हती. महामंडळाच्या घटनात्मक तरतुदींचे उल्लंघन झाल्याची संतापजनक प्रतिक्रिया साहित्यविश्वात उमटत आहे.

महामंडळाची भूमिका

संमेलनाला जोडून कार्यक्रम घेताना आयोजक संस्थेने महामंडळाची परवानगी घेतली नव्हती. महामंडळाच्या घटनात्मक तरतुदींच्या सुरक्षेसाठी आम्ही बांधील आहोत. आयोजकांना याबाबत स्पष्टपणे कळविण्यात येईल, अशी भूमिका आता साहित्य महामंडळाने घेतली आहे.

आयोजकांचे म्हणणे…

साहित्य संमेलनाचे आयोजक संजय नहार म्हणाले की, साहित्य महामंडळाची घटना काय आहे याबाबत त्यांचे पदाधिकारी सांगू शकतील. संमेलनाच्या निमित्ताने जे उपक्रम करायचे असतात त्याअंतर्गत या पुरस्कार सोहळय़ाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

साहित्य संमेलनात मुंबई मराठी पत्रकार संघाचा स्टॉल

मराठी पत्रकारांच्या साहित्याचा ठसा दिल्लीत उमटणार आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सदस्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन दिल्ली येथे होणाऱया साहित्य संमेलनात आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने यंदा मुंबई मराठी पत्रकार संघाच्या आणि मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासातील एक आगळावेगळा योग जुळून आला आहे. संमेलनाची आमंत्रक संस्था सरहद आणि संस्थेचे प्रमुख संजय नहार यांच्या सहकार्याने मुंबई मराठी पत्रकार संघाने पुस्तक प्रदर्शन आयोजित केलेय. प्रदर्शनासाठी सदस्यांना आपल्या पुस्तकांपैकी कुठल्याही एकाच पुस्तकाची प्रत 16 फेब्रुवारीपर्यंत मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात द्यावयाची आहे.