नरेंद्र मोदी पूर्व जन्मात छत्रपती शिवराय होते! भाजप खासदाराचे वादग्रस्त विधान, महाराष्ट्रात संतापाची लाट

नरेंद्र मोदी पूर्व जन्मात छत्रपती शिवाजी महाराज होते, असं वादग्रस्त विधान भाजप खासदार प्रदीप पुरोहित यांनी आज संसदेत आपल्या भाषणादरम्यान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. संसदेत बोलताना ते म्हणाले आहेत की, “गिरजा बाबा म्हणून एक संत आहेत. त्यांच्याशी मी संवाद साधत असताना त्यांनी मला सांगितलं की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्व जन्मात छत्रपती शिवाजी महाराज होते.” त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही संताप व्यक्त केला आहे.

X वर एक पोस्ट शेअर करत अंबादास दानवे म्हणले की, “कुठून येतात असे बिनडोक लोकं, आता हा अपमान महाराष्ट्र भाजपला दिसत नाही का? सेलेक्टेड विषयातून स्टंटबाजी करण्याचे बौद्धिक बहुदा अभ्यास वर्गांमधून भाजपच्या नेत्यांना दिले जाते. विशेष म्हणजे लोकसभेत शिवरायांचे वंशज देखील लोकसभा सदस्य म्हणून बसतात आणि त्याच लोकसभेत हे बोलत आहेत.”