वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रशिक्षणाला अखेर ब्रेक लावण्यात आला आहे. लाल बहादूर शास्त्री प्रशासकीय अकादमी यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाने पूजा खेडकर यांचा जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित केला आहे.
मसुरी येथील प्रशिक्षण संस्थेत 23 जुलैपूर्वी हजर राहण्याचे आदेश पूजा खेडकर यांना देण्यात आले आहेत. खासगी गाडीवर लाल दिवा लावणे आणि स्वतंत्र केबिनसाठी आग्रह धरणे यामुळे प्रोबेशनरी आयएस अधिकारी पूजा खेडकर चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर खेडकर यांचे एकामागून एक कारनामे उघडकीस येत आहेत. त्यांचे शारीरिक अपंगत्व आणि ओबीसी प्रमाणपत्र बोगस असल्याचे समोर आले आहे. याची गंभीर दखल घेत पंतप्रधान कार्यालयाने अहवाल मागवला होता. त्यानंतर केंद्र सरकारच्या कार्मिक मंत्रालय आणि मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री प्रशासकीय अकादमीने पूजा खेडकर यांची चौकशी सुरू केली आहे. राज्य शासनाने 11 जुलै रोजी सादर केलेल्या अहवालानंतर खेडकर यांचे महाराष्ट्रातील प्रशिक्षण स्थगित करण्यात आले आहे.
नावातही बनवाबनवी
यूपीएससीचे अटेम्प्ट वाढवण्यासाठी पूजा खेडकर यांनी त्यांचे नाव आणि वय बदलले होते. 2020 च्या अर्जात पूजा यांनी त्यांचे नाव खेडकर पूजा दिलीपराव आणि वय 30 वर्षे नमूद केले होते. तर, 2023 च्या अर्जात त्यांनी नाव पूजा मनोरमा दिलीप खेडकर आणि वय 31 वर्षे नमूद केले होते. तीन वर्षांच्या कालावधीत त्यांचे वय केवळ एक वर्षाने कसे वाढू शकते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.