
तब्बल 51 कोटी रुपयांची बेहिशेबी रोख रक्कम घरी सापडल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांची पुन्हा अलाहाबाद उच्च न्यायालयात रवानगी करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने सोमवारी न्यायमूर्ती वर्मा यांच्या बदलीचा हा निर्णय जाहीर केला. राजधानी दिल्लीत उघडकीस आलेल्या कॅशकांडच्या पार्श्वभूमीवर कॉलेजियमने 20 मार्च आणि सोमवारी 24 मार्च रोजी बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये कथित कॅशकांडशी संबंध उघड झालेल्या न्यायमूर्ती वर्मा यांची दिल्लीहून पुन्हा अलाहाबाद उच्च न्यायालयात रवानगी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
न्यायमूर्ती वर्मा यांच्या दिल्लीतील घरी लागलेल्या आगीच्या घटनेनंतर त्यांच्या घराच्या आवारात 51 कोटी रुपयांच्या नोटा अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडल्या. या पैशांमुळे न्यायमूर्ती वर्मा संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने सखोल चौकशीसाठी तीन सदस्यांची समिती नेमली आहे.
सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. दोन दिवसांपूर्वीच सरन्यायाधीशांनी न्यायमूर्ती वर्मा यांना दिल्ली उच्च न्यायालयातील कोणतेही प्रकरण सुनावणीसाठी न देण्याचे निर्देश दिल्लीतील मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांना दिले होते. याचदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आपल्या संकेतस्थळावर न्यायमूर्ती वर्मा यांच्या घरी सापडलेल्या 51 कोटी रुपयांच्या रोख रकमेचे व्हिडिओ आणि छायाचित्रे जारी केली होती. त्यामुळे न्यायमूर्ती वर्मा यांच्या अडचणीत वाढ झाली असतानाच सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने न्यायमूर्ती वर्मा यांची दिल्लीतून पुन्हा अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्याचा निर्णय जाहीर केला. न्यायमूर्ती वर्मा यांनी कथित कॅशकांडशी आपला कुठलाही संबंध नसल्याचा दावा केला आहे. मात्र चौकशीतून धक्कादायक बाबी उघडकीस येत असल्यामुळे न्यायमूर्ती वर्मा यांच्या अडचणींत दिवसेंदिवस वाढ होत आहे.