देशांतर्गत प्रवास करताना विमान कंपन्या दिल्ली विमान प्रवासाला 13 हजार 900 तर लखनौ-मुंबई प्रवासाला विमान कंपन्या चक्क 24 हजार 500 रुपये आकारत आहेत. हे दर दुपटी-तिपटीहून जास्त आहेत. त्यामुळे ग्राहकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे विमान प्रवासाचे गगनाला भिडलेले दर नियंत्रणात आणा, अशी आग्रही मागणी मुंबई ग्राहक पंचायतीने नागरी हवाई मंत्रालय आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडे केली आहे.
मुंबई-दिल्ली-मुंबई, लखनौ-मुंबई या मार्गावरील नजीकच्या काळातील प्रवासासाठी एअर इंडिया, इंडिगो, अकासा, स्पाईस जेट या विमान कंपन्यांचे दर दुपटी-तिपटीहूनही जास्त आहेत. इतकेच नव्हे तर अनेकदा इंडिगोसारख्या बजेट एअरलाईन्स एअर इंडियापेक्षासुद्धा जास्त दर आकारत आहेत. बजेट एअरलाईन्स म्हणून या एअरलाईन्स प्रवाशांकडून नाश्ता/खानपानासाठी वेगळी किंमतही वसूल करतात.
सणासुदीच्या दिवशी ग्राहकांची लूट
सणासुदीचे आणि रजेचे दिवस हेरून या विमान कंपन्या नेमक्या अशा काळात विमान प्रवासाचे दर अव्वाच्या सव्वा वाढवून ग्राहकांची सर्रास लूट करत असतात. अशी ही नैमित्तिक दरवाढ पूर्णपणे असमर्थनीय आहे. अशा या एकतर्फी आणि असमर्थनीय दरवाढीवर सरकारचे कोणतेच नियंत्रण का नाही, असा सवाल करत ही सरसकट अनुचित व्यापारी प्रथा असल्याने ती त्वरित रोखावी, अशी मागणी पंचायतीचे कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी नागरी हवाई आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडे केली आहे.