मोदी ज्या देशात जातात तिथे अदानींना कंत्राट, संसदेत चर्चा झालीच पाहिजे; काँग्रेस अध्यक्षांची आग्रही मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी जिथे जातात, ज्या देशात जातात तिथे अदानींना कंत्राट मिळते. ही यादी खूप मोठी आहे. त्यामुळे या मुद्दय़ावर संसदेच्या दोन्ही सभागृहांत चर्चा झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. 267 अंतर्गत संसद अधिवेशनात अदानींच्या लाचखोरीप्रकरणाचा मुद्दा इंडिया आघाडीने लावून धरला. त्यानंतर खरगे यांनी एक्सवरून इंडिया आघाडीची भूमिका मांडली.

अदानी समूहावर भ्रष्टाचार, लाचखोरी आणि आर्थिक अनियमिततांबाबतचे गंभीर आरोप आहेत. या पार्श्वभूमीवर आम्हाला संसदेच्या दोन्ही सभागृहांत अनेक मुद्दे मांडायचे आहेत. जवळपास 2 हजार 200 कोटी रुपयांची लाच देण्यात आली. जनतेच्या पैशांचा वापर लाच देण्यासाठी करण्यात आला. याबाबत आम्ही संसदेच्या माध्यमातून देशासमोर हे प्रकरण आणू इच्छितो. पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळासमोर काही मुद्दे मांडू इच्छितो, असे खरगे यांनी म्हटले आहे. यापूर्वी अदानी समूहावरील शेअर बाजारात हेराफेरी, बँक खात्यांमध्ये भ्रष्टाचार, शेल कंपन्या असे गंभीर आरोप समोर आले आहेत. अदानींच्या लाचखोरी प्रकरणामुळे आपल्या देशावरून जगाचा विश्वास उडाला आहे. त्यामुळे आम्ही अदानी समूहाच्या भ्रष्टाचार, लाचखोरीप्रकरणाचा मुद्दा संसदेत उचलला, असे खरगे यांनी म्हटले आहे.

प्रियांका गांधी 28 तारखेला शपथ घेणार

वायनाडमधून लोकसभा पोटनिवडणुकीत जिंकून आलेल्या काँगेस नेत्या प्रियांका गांधी 28 तारखेला सदस्यत्वाची शपथ घेतील. त्यांच्यासह नांदेडच्या पोटनिवडणुकीत विजय मिळविलेले काँगेसचे राजेश चव्हाणही शपथ घेतील. लोकसभेच्या दोन्ही पोटनिवडणुकीत काँगेसला यश मिळाले आहे.

मोदींच्या आशीर्वादाशिवाय इतर देश अदानींना कसे निवडतील?

विरोधकांनी संसदेत गोंधळ घातल्याचे मोदी म्हणाले, परंतु मोदींनी स्वतः जून 2015 मध्ये बांगलादेशला गेल्यानंतर अदानी समूहाला वीज प्रकल्पाचे कंत्राट मिळाले होते. मलेशिया, इस्रायल, सिंगापूर, श्रीलंका, नेपाळ, तंजानिया, व्हीएतनाम, ग्रीस अशा अनेक देशांत मोदी गेले. तिथे अदानींना प्रकल्प मिळाले. आता लाचखोरी प्रकरण समोर आल्यानंतर केनियाने जनतेच्या दबावामुळे अदानींसोबतचे कंत्राट रद्द केले.

एका पंपनीच्या हितासाठी भ्रष्टाचाराला प्रोत्साहन

एका कंपनीच्या व्यावसायिक हितासाठी भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणे आणि लाचखोरीचा गौरव करण्याच्या केंद्र सरकारच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, असे खरगे यांनी म्हटले आहे. त्यामुळे अदानीप्रकरणी संयुक्त संसदीय समिती नेमायला हवी. तसेच त्यात इंडिया आघाडीचे जास्तीत जास्त सदस्य असावेत, अशी मागणी संसदेत लावून धरल्याचे खरगे यांनी सांगितले. जेपीसी नेमा, सत्य बाहेर येऊ द्या, असेही त्यांनी म्हटले आहे.

संविधानाचा सन्मान कसा राखायचा हे तुम्ही आम्हाला शिकवू नका; खरगेंनी सभापतींना सुनावले

राज्यसभेत आज सभापती जगदीप धनखड व विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. भारतीय राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने उद्या (ता. 26) जुन्या संसद भवनाच्या सेंट्रल हालमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा संदर्भ देत सभापतींनी राज्यघटनेचा सन्मान करा, सभागृहाचा सन्मान करा, असा अनाहूत सल्ला विरोधी पक्षनेते खरगेंना दिला. त्यावर खरगेंनी राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यापैकी 54 वर्षांच्या सार्वजिनक जीवनात आम्ही घटनेचा व संसदेचा सन्मानच केला आहे. तो तुम्ही शिकवू नका, अशा शब्दांत त्यांनी सभापतींना सुनावले. त्यानंतर सभापतींनी राज्यसभेचेही कामकाज बुधवारपर्यंत तहकूब केले. राज्यसभेतही विरोधी पक्षनेते खरगेंनी अदानीचा मुद्दा लावून धरला.