नोटीस बजावूनही ठेकेदारांनी सादर केले अपुरे रेकॉर्ड, मोठा घोटाळा झाल्याचा ‘आप’चा आरोप

शहरात घरोघरी जाऊन कचरा उठाव करणाऱ्या टिप्पर चालकांपैकी प्रत्यक्ष १८० ते १९० चालक उपस्थित असताना तब्बल २५४ चालकांचे पगार उचलणाऱ्या ठेकेदारांचा भांडाफोड झाल्यानंतर प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत संबंधित सहा ठेकेदारांना नोटीस काढूनही त्यांनी अपुरे रेकॉर्ड सादर केल्याचे समोर आले आहे. शिवाय टिप्परचालकांचे फाळणी पुस्तक गहाळ झाल्याचे समोर आल्याने हा मोठा घोटाळा असल्याचा आरोप ‘आप’ कडून करण्यात आला आहे.

टिप्परचालक कंत्राटात तब्बल दीड कोटींचा घोटाळा करणाऱ्या संबंधित ठेकेदारांचा ठेका काढून घ्यावा, त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, तसेच त्यांनी उकळलेली जादा रक्कम वसूल करण्यात यावी, अशी मागणी आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळाकडून महापालिकेचे अतिरिक्त आयक्त राहल रोकडे यांच्याकडे करण्यात आली. या संदर्भात आयुक्त तथा प्रशासकांना वस्तुस्थिती अहवाल मांडणार असल्याचे आश्वासन रोकडे यांनी दिले.

शहरात घरोघरी जाऊन कचरा उठाव करण्यासाठी टिप्पर गाडीवर चालक पुरवठा करण्यासाठी सहा कंत्राटदारांचे पॅनल महापालिकेने नियुक्त केले आहे. प्रत्यक्ष १८० ते १९० चालक उपस्थित असताना २५४ चालकांचे पगार उचलले जात असल्याने यातून तब्बल दीड कोटींचा घोटाळा कंत्राटदारांनी केल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी ‘आप’ने उघडकीस आणल्याने खळबळ उडाली होती.

दरम्यान, याप्रकरणी संबंधित ६ कंत्राटदारांना यापूर्वी दोन नोटिसा काढून सर्व रेकॉर्ड सादर करण्यास सांगितले होते. पण त्यांनी अपुरे रेकॉर्ड सादर केल्याचे बैठकीत स्पष्ट झाले. याप्रकरणी अतिरिक्त आयुक्त रोकडे, सहायक आयुक्त स्वाती दुधाणे, सीएसआय पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ‘आप’ने एप्रिल ते नोव्हेंबरपर्यंतच्या नोंदी तपासण्यासाठी फाळणी पुस्तक घेऊन येण्याची मागणी केली होती. पण अधिकारी, कर्मचारी पुस्तक घेऊन आले नाहीत. यावेळी हजेरी वहीतील तफावतही ‘आप’कडून बैठकीत निदर्शनास आणून दिली.

चुकीचे रेकॉर्ड सादर करणे, पीएफ, इएसआयसी, बैंक स्टेटमेंट जमा न करणे, महिन्याचा पगार सात तारखेपर्यंत न करणे, सही केलेले हजेरी मस्टर महापालिकेला जमा न करणे, महापालिकेची फसवणूक करून २५४ चालकांचे बिल उचलणे हे मुद्दे चौकशी अहवालात घ्यावेत, अशी मागणी ‘आप’चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केली. यावेळी उत्तम पाटील, अभिजित कांबळे, दुष्यंत माने, विजय हेगडे, मयूर भोसले आदी उपस्थित होते.

फाळणी पुस्तक गहाळ 

अतिरिक्त आयुक्त यांनी सहायक आयुक्तांना फाळणी पुस्तक ताब्यात घेण्यास सांगितले. त्यांनी सीएसआय यांना पुस्तक आणण्यास सांगितले. मुकादम संग्राम यांनी केएमटी वर्कशॉप, सर्व कंत्राटदार यांचे ऑफिस, संबंधित कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली; पण पुस्तक सापडले नाही. त्यामुळे टिप्पर चालकांच्या रोजच्या कामाची नोंद असणारे फाळणी पुस्तक गहाळ झाल्याचे स्पष्ट झाले. रात्री उशिरापर्यंत पुस्तक शोधण्याचे काम सुरू होते. त्यामुळे आयुक्त तथा प्रशासकांसमोर वस्तुस्थिती अहवाल सादर करणार असल्याचे सहायक आयुक्त स्वाती दुधाणे यांनी सांगितले.