रायगडकरांचा आनंदाचा शिधा मिंध्यांच्या लाडक्या ठेकेदारांनी अडवला; गणपती जाऊन दिवाळी तोंडावर आली तरी पत्ता नाही

खोके सरकारने गणेशोत्सवात आनंदाचा शिधा देण्याचे जाहीर केले होते. मात्र लाडका बाप्पा गावाला जाऊन महिना उलटला असून आता दिवाळीदेखील तोंडावर आली तरी रायगडातील जवळपास चार लाख नागरिकांना आनंदाचा शिधाच दिला नसल्याचे समोर आले आहे. शिधा वितरण करण्यासाठी मिंधे सरकारने नेमलेल्या ठेकेदारांनी घोळ घातल्यानेच हा फटका बसला आहे. त्यामुळे गोरगरीबांचा तोंडचा घास अडवणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाईचा बडगा उगारा अशी मागणी रायगडकरांनी केली आहे.

गोरगरीबांना सण-उत्सव आनंदात साजरा करता यावा यासाठी राज्य सरकारने मागील दोन वर्षांपासून आनंदाचा शिधा ही योजना सुरू केली आहे. गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गणेशोत्सव, दिवाळी व इतर सणासुदीच्या काळात त्याचे वाटप करण्याचे जाहीर केले. एक किलो रवा, साखर, चणाडाळ, एक लिटर सोयाबीन तेल शंभर रुपयांत देण्यात येते. परंतु ‘नव्याचे नऊ दिवस’ या उक्तीप्रमाणे सरकारचा कारभार सुरु असल्याचे दिसून आले आहे.

गणेशोत्सवामध्ये आनंदाचा शिधा देण्याचे जाहीर केले होते. बाप्पाच्या आगमनापूर्वी हा शिधा मिळेल, अशी आशा सर्वसामान्यांना होती. परंतु गणेशोत्सव संपून जवळपास एक महिना उलटला तरी जिल्ह्यातील लाखो ग्राहकांपर्यंत आनंदाचा शिधाच पोहोचला नाही.

लाभार्थ्यांच्या संख्येत घट

रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे चार लाख 36 हजारांहून अधिक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत होता. परंतु या आकडेवारीत सुमारे 40 हजारांनी घट झाल्याची माहिती समोर येत आहे. ऑनलाइनचे प्रमाण कमी झाल्याने तसेच सर्वच लाभार्थी या योजनेचा लाभ घेत नसल्याने ही आकडेवारी कमी झाल्याची माहिती जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून देण्यात आली. मात्र या आकडेवारीत घट होण्यामध्ये नक्की कोण जबाबदार आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

“रायगड जिल्ह्यामध्ये तीन लाख 98 हजार लाभार्थी आहेत. उरण व अलिबाग तालुक्याचे शंभर टक्के जिन्नस उपलब्ध झाले आहेत. त्याचे वाटपही सुरू केले आहे. अन्य तालुक्यांत सर्व वस्तू शंभर टक्के उपलब्ध झाल्या नसल्याने वाटप थांबवले आहे. पूर्ण जिन्नस आल्यावर वाटप सुरू केले जाईल.”

सर्जेराव सोनावणे, जिल्हा पुरवठा अधिकारी, रायगड