लाडके कंत्राटदार आणि भ्रष्ट मंत्र्यांना तुरुंगात टाकणार! आदित्य ठाकरे यांची आक्रमक भूमिका

मुंबई पालिकेतील सहा हजार कोटींचा घोटाळा बाहेर काढल्यानंतर याच रस्ते कामांची किंमत 900 कोटींनी कमी झाली. असे असताना कॉट्रक्टर मित्रांना पुन्हा काम देण्यासाठी कोटय़वधींची ‘आगाऊ रक्कम’ देण्याचे कारस्थान सुरू आहे. मात्र आधीच्या घोटाळय़ातील दोषींवर काय कारवाई केली, किती दंड केला, कुणाला काळय़ा यादीत टाकले याबाबत कोणतीही माहिती देण्यात येत नाही. घटनाबाह्य मिंधे सरकार आणि पालिकेने लक्षात ठेवावे की आमचे सरकार आल्यावर मुंबईला लूटणारे लाडके कंत्राटदार आणि भ्रष्ट मंत्री, अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकणार, असा इशारा शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिला.

महाराष्ट्राची लूट करणाऱ्या मिंधे-भाजप सरकारकडून कंत्राटदारांच्या फायद्यासाठी काम सुरू असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला. वांद्रे-वर्सोवा लिंक रोडच्या कामाची किंमत पावणे सात हजार कोटींनी वाढल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. हा प्रकार कंत्राटदार मित्रांच्या भल्यासाठी सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. गेल्या वर्षी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या रस्ते कामातील एकही काम झाले नसल्याचे ते म्हणाले. 2021-22 मध्ये एकही टेंडर मिळाले नाही. त्यामुळे एकही रस्ता काम झाले नाही. यानंतर ऑगस्ट, नोव्हेंबरमध्ये टेंडर निघाले, पण मिंध्यांच्या काँट्रक्टर मित्राला ते आवडले नाही, म्हणून नव्याने टेंडर काढण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

…मग भाजप मिंध्यांचा पाठिंबा काढणार का?

केंद्राच्या अखत्यारीमधील नॅशनल हायवे अॅथोरिटीला मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-नाशिक महामार्ग आणि मुंबई-अहमदाबाद महामार्गाची दुर्दशा दिसत नाही का, असा सवालही त्यांनी केला. कोस्टल रोडवरही हाजीअली येथे रस्ता उखडला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी मार्गावर अपघात वाढले असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. काही वेळा रस्ते कामाबाबत भाजपकडूनही टीका केली जाते, मग भाजप मिंधे सरकारचा पाठिंबा का काढून घेत नाही, असा सवालही त्यांनी केला.

घोटाळेबाज कंत्राटदारांवर काय कारवाई केली?

पालिकेत आपण 6080 कोटींचा घोटाळा बाहेर काढल्यानंतर 2023 मध्ये कंत्राटदाराने काम सोडले. त्यांना दंड केला, ब्लॅकलिस्ट केले हे अजून स्पष्ट केले नाही. त्या पाच कंत्राटदारांवर कोणती कारवाई केली, दंड अजून घेतला नसेल तर का नाही घेतला याची माहिती प्रसारमाध्यमे किंवा आपल्याला का देत नाही, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला.

महाराष्ट्रावर इतका द्वेष कशासाठी?

राज्याचा अर्थसंकल्प असो किंवा केंद्राचा, महाराष्ट्राला काहीच मिळालेले नाही. महाराष्ट्राची लूट मात्र सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर इतका द्वेष कशासाठी, असा सवालही त्यांनी केला. मात्र नोव्हेंबरमध्ये आमचे सरकार बसणार. त्यामुळे आम्ही घोटाळेबाजांचे पेमेंट रोखणार, सखोल चौकशी करणार आणि महाराष्ट्राची लूट करणाऱ्यांना तुरुंगात टाकणार असेही ते म्हणाले.

कंत्राटदारांचे खिसे भरण्याचे काम

निवडणुका तोंडावर आल्यामुळे मागच्या वर्षीची कामे झाली नसताना कंत्राटदार मित्रांचे खिसे भरण्यासाठी आता नव्याने सहा हजार कोटींची टेंडर प्रक्रिया राबवली जात असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. यातून मिंधे सरकारला किती खोके मिळणार, असा सवालही त्यांनी केला. याआधी ब्लॅकलिस्ट केलेली कंपनी पुन्हा काम करण्यासाठी येते. त्यामुळे ही ब्लॅकलिस्ट सिरीयसली घ्यायची का, असा सवालही त्यांनी केला.