गेल्या चार वर्षांपासून लाडका ठेकेदार एकाच परवान्यावर बेकायदेशीरपणे डोंगर पोखरत असल्याचे उघडकीस आले आहे. काणसेवाडी येथील डोंगर फोडल्याने तो अक्षरशः ठेंगणा केला आहे. त्यामुळे देवघर, घोणसे गावातील हजारो गावकऱ्यांचा जीव टांगणीला लागला असून ‘तळीये’ तर होणार नाही ना, या भीतीने त्यांची झोपच उडाली आहे. याबाबत अनेकदा आवाज उठवूनही प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
दिघी पुणे राष्ट्रीय मार्गावरील माणगाव ते म्हसळा दिघी या 60 किमी अंतराच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले होते. या कामाचा ठेका जे. एम. म्हात्रे या ठेकेदाराला देण्यात आला. रस्त्याच्या बांधकामाला लागणाऱ्या दगड खाणीसाठी ठेकेदाराने 2018 साली सरपंच रमेश कांसे यांना हाताशी धरून काणसे वाडी जवळील डोंगर पोखरण्यासाठी परवानगी घेतली होती.ही परवानगी दोन वर्षांसाठी होती. दिघी पुणे राष्ट्रीय महामार्ग दोन वर्षांत पूर्ण झाला. मात्र मुजोर ठेकेदार हा गेल्या चार वर्षांपासून एकाच परवानगीवर डोंगर पोखरत आहे. ठेकेदार जे. एम. म्हात्रे यांनी सध्या गुलाम वसगरे या ठेकेदाराला दगड खाण चालवायला दिली आहे. डोंगर पोखरून मोठ्या प्रमाणावर होत असलेले अवैध उत्खनन हे महसूल विभाग आणि ग्रामपंचायत प्रशासन उघड्या डोळ्याने बघत आहे. मात्र तरीदेखील प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्याने ठेकेदारांवर कोणाचा हात आहे, अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.
कडक कारवाई करा
दगड खाणीत ब्लास्ट कधी आणि कसे झाले याची तारीख, वार, वेळेची नोंद करून समाजसेवक योगेश महागावकर यांनी याची तक्रार महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, जिल्हा अधिकारी, तहसीलदार आणि म्हसळा महसूल विभागाला लेखी पत्र देऊन केली आहे.
ब्लास्टमुळे घरांना तडे
उत्खनन होत असलेल्या दगड खाणीत 40 फूट खोल बोर मारून जिलेटीनच्या कांडीने ब्लास्ट करून उत्खनन केले जात आहे. या ब्लास्टमुळे दोन वर्षांपूर्वी देवघर आणि घोणसे गावाच्या सहा वाडीत हादरे बसून घरांना तडे गेले होते. अनेक गावे डोंगरावर वसलेली आहेत. खाणीत ब्लास्ट करून उत्खनन करण्यात येत असल्याने मुसळधार पावसात डोंगरावरील घरे कधीही कोसळतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.