मोटारीवर कंटेनर कोसळून झालेल्या भीषण अपघातात सांगलीतील एकाच कुटुंबातील सहाजणांचा चिरडून मृत्यू झाला. ही घटना बंगळुरू-तुमकूर राष्ट्रीय महामार्गावर नेलमंडलजवळ येथे आज सकाळी घडली.
चंद्राम इरगोंडा येगापगोळ, पत्नी गौरम्मा चंद्राम येगापगोळ, मुलगा ज्ञान, मुलगी दीक्षा, विजयलक्ष्मी मल्लिनाथ येगापगोळ-टकळकी, आर्या मल्लिनाथ येगापगोळ-टकळकी (सर्वजण रा. मोरबगी, ता. जत) यांचा जागीच मृत्यू झाला. मोरबगी येथील मूळ रहिवासी असलेले व सध्या कर्नाटकातील बंगळुरू येथे स्थायिक झालेले चंद्राम येगापगोळ हे उद्योजक होते. त्यांची स्वतःची बंगळुरू येथे एचएसआरएल औट परिसरात आएएसटी सॉफ्टवेअर कंपनी आहे.
तसेच विदेशात त्यांचे उद्योग आहेत. आई-वडिलांना भेटण्यासाठी ते आपल्या मोटारीने कुटुंबीयांसोबत मोरबगी गावी येत होते. आजही ते कुटुंबीयांसोबत नातेवाईकांच्या लग्नसोहळ्यासाठी गावी येण्यास निघाले. चंद्राम यांनी लांबचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी दोन महिन्यांपूर्वीच दीड कोटीची नवी कार खरेदी केली होती.