
नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर सोमवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास नगरकडून छत्रपती संभाजीनगरकडे जाणार्या कंटेनरने 8 वाहनांना पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये 7 ते 8 जण जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. कंटेनरने रस्त्यामध्ये असलेल्या सात ते आठ वाहनांना धडक दिल्यानंतर एकमेकांवर वाहने आदळली गेली. या विचित्र अपघातामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण होते.
काही अंतरावर जाऊन कंटेनर चालकाने कंटेनेर तेथेच सोडून पळ काढला. अपघाताची माहिती मिळताच सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके पथकासोबत घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी नगर येथील रुग्णालयात पाठवत वाहतूक सुरळीत केली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 7ते 8 जणांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे नगर- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. सोनेई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आणि वाहतूक सुरळित केली.