SC ने नशेबाजांना खडसावले, ड्रग्सचे सेवन ‘कुल’ नाही; सर्वांना केले आवाहन

ड्रग्सच्या विळख्यामध्ये देशातला तरुण अडकलाय. मोठ्या संख्येने तरुण नशेच्या आहारी जात आहेत. यावरुन सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी चिंता व्यक्त करत ड्रग्जसे सेवन ‘कुल’ नसल्याची महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. न्यायमुर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती एन. कोटेश्वर सिंह यांच्या खंडपीठाने एका सुनावणीदरम्यान ही महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे.

हिंदुस्थानात पाकिस्तानातून समुद्रमार्गे हेरॉईनची तस्करी केल्याप्रकरणी आरोपी अंकुश विपन कुमार याची चौकशी करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने NIA ला दिले. यावेळी न्यायमूर्ती नागरत्ना आणि न्यायमूर्ती एन. कोटेश्वर सिंह यांच्या खंडपीठाने अंमली पदार्थांच्या सेवनामुळे सामाजिक आणि आर्थिक धोका वाढत असल्याचे म्हटले आहे. देशातील तरुणांची उमेदीची वर्षे वाया जात असून अंमली पदार्थांच्या व्यसनावर तातडीने सामुहिक कारवाई करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. सरकारने, समाजाने आणि पालकांनी मिळून या गंभीर समस्येच्या विरोधात एकवटलं पाहिजे असेही खंडपीठाने म्हटले आहे.

व्यसनाधीन तरुणांची वाढती संख्या चिंताजनक आहे. वय, जातीधर्माच्या पलीकडे जात ड्रग्सच्या सेवनाचा गंभीर परिणाम समाजावर होतोय. अंमली पदार्थांच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न दहशतवादाला खतपाणी घालत आहे आणि त्यामुळे समाजात अस्थिरता निर्माण करण्यासाठी फंडींग निर्माण होते, असे न्यायमूर्ती नागरत्ना यांनी म्हटले आहे.

समाजात पसरत असलेल्या या गंभीर समस्येच्या विरोधात सर्वांनी एकत्र आले पाहिजे. विशेषकरून तरुणांनी या गंभीर आव्हानाचा सामना करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. तसेच व्यसनाच्या आहारी गेलेल्यांशी प्रेमाने आणि सहानुभूतीने वागत त्यांना व्यसनमुक्त पाहिजे. अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर आणि त्यांच्या पैसे कमावण्याच्या माध्यमांवर प्रहार करण्याची गरज आहे. अंमली पदार्थांचा होत असलेला प्रसार बंद करून अंमली पदार्थांच्या धोक्यांसदंर्भात तरुणांना त्याची जाणीव करून दिली पाहिजे, असे आवाहन खंडपीठाने केले आहे.