चेहरा गोरा न झाल्याने फेअरनेस क्रिम कंपनीला 15 लाखांचा दंड

चेहरा गोरा किंवा उजळ करण्याचा दावा करणारी अनेक उत्पादने बाजारात पाहायला मिळतात. असा दावा करणे एका कंपनीला चांगलेच महागात पडले. एका ग्राहकाने 79 रुपयांची क्रीम खरेदी केली. पण कंपनीने दावा केल्याप्रमाणे त्याचा चेहरा गोरा झाला नाही. त्यानंतर ग्राहकाने कंपनीला कोर्टात खेचलं. न्यायालयाने कंपनीची जाहिरात दिशाभूल करणारी असल्याचे मानले आणि दावा चुकीचा सिद्ध झाल्याने कंपनीला 15 लाख रुपयांचा दंड ठोठावला. त्यामुळे आता कंपनीला  ग्राहकाला पैसे द्यावे लागणार आहेत. दिल्ली येथील ग्राहक मंचाने हा निर्णय देत सौंदर्यप्रसाधन कंपनी इमामी लिमिटेडला 15 लाख रुपयांचा दंड ठोठावला. फोरमचे अध्यक्ष इंदर जीत सिंग आणि सदस्य रश्मी बन्सल यांनी 9 डिसेंबर रोजी याबाबतचा आदेश दिला. कंपनीने क्रिमवर असलेल्या लेबलमधून जो दावा केला आहे, त्याचे परिणाम प्रत्यक्षात मिळत नसल्याचे स्पष्ट झाल्याचे मंचाने निर्णय देताना सांगितले.  

कंपनीने ग्राहकांवर टाकली जबाबदारी

कंपनीने लेखी निवेदनात ही जबाबदारी झटकल्याचे पाहायला मिळाले. कंपनीने दावा केला, की उत्पादनामधून अपेक्षित परिणाम साध्य करण्यासाठी वैयक्तिक काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी उत्पादनाचा योग्य वापर आणि पौष्टिक आहार, व्यायाम, चांगल्या सवयी आणि आरोग्यदायी राहणीमान यासारख्या अनेक घटकांची आवश्यकता असते. यावर ग्राहक मंचाने म्हटलं की, ‘उत्पादनाच्या पॅकेजिंग आणि लेबलिंगवर अशा अटींचा उल्लेख केलेला नाही. अंतिम लेखी युक्तिवादांमधील आणखी एक मुद्दा असा आहे की उत्पादन 16-35 वयोगटातील सामान्य तरुण पुरुषांसाठी (आजारी  व्यक्ती नव्हे)  आजारी व्यक्ती म्हणजे काय? पॅकेजिंगवर  ही अतिरिक्त माहितीदेखील नमूद केलेली नाही.