बुकिंग केले, पण रूम नाकारला! मेक माय ट्रिप आणि हॉटेलला दणका; पर्यटकाला 50 हजारांची भरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

वाहतूक, हॉटेल सेवा पुरवणाऱ्या मेक माय ट्रिप कंपनीसह मनालीतील एका हॉटेलने ग्राहकांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ऑनलाईन बुकिंग करूनही ग्राहकांना राहण्यास ऐन वेळी रूम नाकारल्याची गंभीर दखल घेत ग्राहक तक्रार निवारण आयोगाने मेक माय ट्रिपसह हॉटेलला चांगलाच दणका दिला आहे. ग्राहकांना झालेला मनस्ताप व त्रासाप्रकरणी ग्राहक न्यायालयाने 50 हजारांची भरपाई देण्याचे आदेश मेक माय ट्रिप व हॉटेलला दिले आहेत.

प्रभादेवी येथे राहणाऱ्या रिधीना नागवेकर यांनी 24 ते 26 डिसेंबर 2019 रोजी राहण्यासाठी मनालीतील हॉटेल कलिंगा ग्रॅण्ड येथे दोन रूम मेक माय ट्रिप या ऑनलाईन पोर्टलवरून बुक केल्या. त्यासाठी त्यांनी 3 हजार 406 आणि 3 हजार 808 रुपये कंपनीला अदा केले. तक्रारदार नागवेकर यांचे कुटुंबीय त्या ठिकाणी 24 डिसेंबर 2019 रोजी गेले असता हॉटेल व्यवस्थापनाने त्यांना रूम नाकारली.