लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राजकीय श्रेय घेण्यासाठी बांधकाम सुरू असलेल्या राम मंदिराचे भाजपने घाईघाईने उद्घाटन केले. मात्र, राम मंदिराचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही. सुरुवातीला डिसेंबर 2024 साली आणि त्यानंतर जून 2025 साली मंदिर बांधून पूर्ण होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, आता बांधकामासाठी मजूरच मिळत नसल्याचे सांगत राम मंदिर आता सप्टेंबर 2025 पर्यंत पूर्ण होईल, असे बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांनी म्हटले आहे.
अयोध्येतील राम मंदिर बांधकाम समितीची बैठक आज झाली. बैठकीनंतर नृपेंद्र मिश्र यांनी माहिती दिली.
निष्कृष्ट बांधकाम
राम मंदिरात बसवलेले संगमरवरी दगड अनेक ठिकाणी कमकुवत झाले आहेत. हे कमकुवत मार्बल काढून मकराना मार्बल बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राम मंदिराच्या तळमजल्यावरील गुढी मंडपाच्या भिंती आणि खांबांवर पांढरा संगमरवरी दगड वापरण्यात आला आहे तसेच गर्भगृह वगळता राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावर संगमरवरी दगड बसवण्यात आले आहेत. ते आता बदलले जाणार आहेत.