मालवण पुतळा दुर्घटना प्रकरण, बांधकाम सल्लागाराचा जामीन अर्ज फेटाळला

मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटनेप्रकरणी अटक केलेल्या बांधकाम सल्लागाराला गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने झटका दिला. आरोपी डॉ. चेतन पाटीलचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. पाटील सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला होता. मात्र सात महिन्यांतच पुतळा कोसळला आणि भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला. याप्रकरणी पुतळा शिल्पकार जयदीप आपटे व बांधकाम सल्लागार चेतन पाटीलला अटक करण्यात आली. हे दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. पोलीस कोठडी संपल्यानंतर चेतन पाटीलने जामिनावर तुरुंगातून सोडण्याची विनंती करीत अर्ज केला होता. त्याचा हा अर्ज गुरुवारी मुख्य जिल्हा न्यायाधीश एच. डी. गायकवाड यांनी नामंजूर केला.