शालेय विद्यार्थी सुरक्षेचे ‘तीन-तेरा’, सातत्याने स्कूल बसेसना आग, अपघात; आरटीओची तोकडी कारवाई

खराडी भागात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बसला आग लागल्याची घटना घडली. चालकाने प्रसंगावधान दाखविल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला. मात्र, स्कूल बसेसना आग लागणे तसेच अपघातांच्या अनेक घटना यापूर्वी शहरात घडल्या आहेत. सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे शालेय विद्यार्थी वाहतुकीची सुरक्षाच धोक्यात आली असून वेळोवेळी बसेसची तपासणी तसेच प्रभावी कारवाई होत नसल्यानेच या घटना घडत आहेत. केवळ एखादी अप्रिय घटना घडल्यानंतर जागे झालेल्या आरटीओच्या पथकाकडून तोकडी कारवाई केली जाते.

पुणे शहरात जवळपास ६ हजार ३६८ स्कूल बसेस, व्हॅनची संख्या आहे, तर पिंपरी-चिंचवड शहरात २ हजार ९५१ स्कूल वाहने आहेत. या वाहनांमधून रोज हजारो विद्यार्थी प्रवास करतात. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला घेऊन विशिष्ट नियमावली आहे. यात स्कूल बस व स्कूल व्हॅनच्या रंगापासून ते आसन क्षमता व वेगावरील मर्यादाही आखून दिली आहे. न्यायालयाचा आदेश व परिवहन विभागाच्या निर्देशानुसार शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना आरटीओकडून योग्यता प्रमाणपत्र तपासणी (फिटनेस) दरवर्षी करणे बंधनकारक केले आहे. मात्र, मुदत संपल्यानंतरही अनेक स्कूल वाहने फिटनेस तपासणी करत नाहीत. त्यामुळे यातील काही वाहने विना फिटनेस रस्त्यावर धावतात. त्यामुळे अशा वाहनांचा अपघात होणे तसेच काहीवेळा आगीच्या घटना समोर येतात. खराडी परिसरातील तुळजाभवानी नगरमध्ये गुरुवारी दुपारी स्कूल बसला आग लागल्याची घटना घडली. यावेळी बसमध्ये पंधरा ते वीस विद्यार्थी होते. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली, तर काही दिवसांपूर्वीच पुणे कॅन्टोन्मेंटमधील शाळेच्या बसला रस्त्यावर आग लागल्याची घटना घडली होती.