अल्पवयीन पत्नीसोबत संमतीने शारीरिक संबंध बलात्कारच, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

bombay-high-court-1

पतीने अल्पवयीन पत्नीसोबत संमतीने ठेवलेले शारीरिक संबंध हा बलात्कारच ठरतो, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे.

हा निर्वाळा देत न्या. गोविंद सानप यांच्या एकल पीठाने आरोपी पतीची बलात्काराची शिक्षा कायम केली. अल्पवयीन असली तरी ती माझी पत्नी होती. तिच्यासोबत संमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार ठरू शकत नाहीत, हा आरोपी पतीचा युक्तिवादही न्यायालयाने फेटाळून लावला.

पत्नीने शारीरिक संबंधासाठी नकार दिला तर तो बलात्कारच असतो, असे सर्वोच्च न्यायालयाने एका निकालात स्पष्ट केले आहे. असे असताना या प्रकरणातील आरोपीचा कोणताच दावा मान्य केला जाऊ शकत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

पत्नी अल्पवयीन असल्याचे पुरावे

शारीरिक संबंध ठेवले गेले तेव्हा पत्नी अल्पवयीन होती हे पोलिसांनी सबळ पुराव्यानिशी सिद्ध केले आहे, असेदेखील न्यायालयाने नमूद केले.

घरातच केला विवाह

हे जोडपे एकमेकांच्या प्रेमात होते. प्रेयसी अल्पवयीन होती. लग्नाचे आमिष दाखवून प्रियकराने संबंध ठेवले. प्रेयसीने लग्नासाठी आग्रह केला. प्रेयसीसोबत राहण्यासाठी प्रियकराने घर घेतले. या भाडय़ाच्या घरात त्याने प्रेयसीसोबत लग्न केले. पत्नी गरोदर राहिली. त्याने गर्भपातासाठी तगादा लावला. पत्नीला मारहाण केली. अखेर पत्नीने पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवला. वर्धा जिल्हा न्यायालयाने पतीला बलात्कारासाठी दोषी धरले. त्याविरोधात पतीने नागपूर खंडपीठासमोर अपील दाखल केले होते.

पत्नीची इच्छा महत्त्वाची

आमचे लग्न झाले होते हा पतीचा दावा ग्राह्य धरला तरी शारीरिक संबंधांसाठी माझ्यावर जबरदस्ती झाली, असे पत्नीने सांगणे म्हणजे बलात्कारच असतो, असे न्यायालयाने म्हटले.