काँग्रेस कार्यकर्त्यांची ईडी कार्यालयावर धडक, नॅशनल हेरॉल्डप्रकरणी सुरू असलेल्या कारवाईचा निषेध

नॅशनल हेरॉल्डप्रकरणी काँग्रेस नेत्याविरोधात आरोपपत्र दाखल करून ईडीने सुरू केलेल्या कारवाईचे तीव्र पडसाद आज मुंबईत उमटले. केंद्र सरकारच्या दबावाखाली ईडीकडून करण्यात येत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुंबईतील ईडीच्या कार्यालयावर धडक दिली. याप्रकरणी एमआरए मार्ग पोलिसांनी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नॅशनल हेरॉल्डप्रकरणी ईडीने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते यांच्याविरोधात सूडबुद्धीने कारवाई सुरू केली आहे. याविरोधात काँग्रेसच्या वतीने सर्वत्र निदर्शने केली जात आहे. शनिवारी दुपारी काँगेस कार्यकर्त्यांनी दक्षिण मुंबईतील ईडीच्या कार्यालयावर धडक दिली. शनिवार असल्याने ईडीच्या कार्यालयाला सुट्टी होती. अचानक काँग्रेसचे कार्यकर्ते हे घोषणाबाजी करत कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ड्युटीवर असलेल्या सुरक्षा रक्षकाने याची माहिती एमआरए मार्ग पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत ईडीच्या कार्यालयात घुसू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.