
ईडी, सीबीआयच्या कारवायांनी मोदी सरकार काँग्रेसचा आवाज दडपू शकत नाही, असं म्हणत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे. माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.
रमेश चेन्नीथला म्हणाले आहेत की, “केंद्रातील तानाशाही मोदी सरकार ईडी, सीबीआयचा गैरवापर करत विरोधी पक्षांना संपवू पहात आहे, त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे. सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या विरोधात ईडीची कारवाई ही राजकीय हेतूने केलेली आहे. मोदी-शहा अशा कारवाया करून काँग्रेस पक्षाला संपवू शकत नाहीत आणि अशा कारवायांनी काँग्रेसचे मनोधैर्य तसूभरही खचणार नाही उलट मजबूतपणे या हुकुमशाहीचा मुकाबला करू.”
रमेश चेन्नीथला म्हणाले की, “मोदी सरकारने सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर केलेल्या कारवाईचा आम्ही निषेध करतो. जनतेत या कारवाईबद्दल तीव्र रोष आहे. काँग्रेस पक्षाने या दडपशाही विरोधात काल व आज दोन दिवस देशभर आंदोलन केले, महाराष्ट्रातही विविध ठिकाणी आंदोलन करून भाजपा सरकारचा निषेध केला. मोदी शाह यांच्या सरकार विरोधात यापुढेही काँग्रेस पक्ष मजबूतीने लढा देईल.”
दरम्यान, मोदी सरकारकडून सुरु असलेल्या ईडीच्या गैरवापराविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली दादर येथील इंडिया बुल्स जवळ आंदोलन केले. या आंदोलनात विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते आ. विजय वडेट्टीवार, सतेज पाटील यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका करण्यात आली.