Cross Voting : काँग्रेसच्या दगाबाज आमदारांची उद्या झाडाझडती

विधान परिषद निवडणुकीत पक्षाशी दगाफटका करणाऱया काँग्रेस आमदारांची राष्ट्रीय सरचिटणीस के. वेणुगोपाल यांच्यासमोर शुक्रवारी परेड होणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेसच्या महत्त्वाच्या बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यावेळी या आमदारांची हजेरी घेतली जाणार असल्याचे सांगितले जाते.

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या सात आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याची तक्रार प्रदेश काँग्रेसने पक्षश्रेष्ठाRकडे केली होती. त्याची गंभीर दखल पक्षश्रेष्ठाRनी घेतली असून आगामी निवडणुकांचा विचार करून आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्यांशी विचारविमर्श करून कारवाईचा निर्णय घेण्याच्या सूचना पक्षश्रेष्ठीनी दिल्याचे सूत्रांकडून समजते. त्या विषयावर शुक्रवारी गरवारे क्लबमधील बैठकीत चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्या बैठकीला राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आदी नेते उपस्थित राहणार आहेत.

दुसरी बैठक त्याच दिवशी दुपारी टिळक भवन येथे होणार आहे. त्या बैठकीला राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, प्रदेश आणि जिह्याचे पदाधिकारी, खासदार, आमदार यांची ती संयुक्त बैठक असणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण, आगामी निवडणुकीच्या तयारीचा आढावा, मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचा आढावा तसेच संघटनात्मक बाबींवर चर्चा होणार आहे. त्या बैठकीला के. वेणुगोपाल आणि चेन्नीथला यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

के. वेणुगोपाल आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक गरवारे क्लब येथे होणार आहे. त्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेऊन रणनीती ठरवली जाणार आहे.