Jammu and Kashmir – अब्दुल्ला सरकारला काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा, नक्की कारण काय?

जम्मू-कश्मीरमध्ये आज नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. 11 वाजून 30 मिनिटांनी ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत आणखी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचे काही नेते मंत्रीपदाची शपथ घेतील अशी चर्चा होती. मात्र आता नवीन माहिती समोर आली असून काँग्रेसने अब्दुल्ला सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘एनडीटीव्ही‘ने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-कश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक पार पडली. नॅशनल कॉन्फरन्सने 90 पैकी 42 जागा जिंकल्या, तर मित्रपक्ष काँग्रेसने 6 जागा जिंकल्या. निवडणुकीपूर्वी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने आघाडी केली होती.

दोन्ही पक्षांना मिळून 48 जागा मिळाल्या. त्यानंतर सर्वाधिक जागा जिंकलेल्या नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. जम्मू-कश्मीरमध्ये नायब राज्यपाल मनोज सिन्हा सकाळी 11.30 वाजता शेर-ए-कश्मीर इंटरनॅशनल कनव्हेन्शन सेंटर येथे ओमर अब्दुल्ला आणि त्यांच्यासोबत मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील.

ओमर अब्दुल्ला सरकारमध्ये काँग्रेसला दोन मंत्रीपद मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र काँग्रेस हायकमांडने अब्दुल्ला सरकारमध्ये सहभागी होण्यास नकार देत बाहेरून पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस बाहेरून पाठींबा देणार असला तरी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे अब्दुल्ला यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील.

नक्की कारण काय?

काँग्रेसने सरकारमध्ये सहभागी न होण्याचे कारणही स्पष्ट केले आहे. जम्मू-काश्मीरमधील स्थानिक नेत्यांना सरकारमध्ये वाटा हवा होता, मात्र काँग्रेस हायकमांड पक्षाच्या खराब कामगिरीमुळे स्थानिक नेत्यांवर नाराज आहे. त्यामुळे काही लोकांना मंत्रीपद देण्यापेक्षा खोऱ्यात संघटना मजबूत करण्यावर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला. खराब कामगिरीनंतरही मंत्रीपदाची खिरापत काँग्रेस हायकमांडला नको असल्याची चर्चा आहे.