
हिंदी भाषा सक्तीची करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याचा कारभार ज्या भाषेत चालत होता ती भाषाच भाजप नष्ट करायला निघाला आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. दक्षिण भारतात हिंदी भाषेला तीव्र विरोध आहे, मग महाराष्ट्रात सक्ती का? मराठी भाषा बोलणारे हिंदू नाहीत का? असा सवाल त्यांनी केला आहे.
मराठी भाषा ही महाराष्ट्राची अस्मिता व संस्कृती असून आपल्या संस्कृतीवरच घाला घालण्याचा प्रयत्न भाजप सरकार करत आहे. विविधतेत एकता ही आपली ओळख असून ती ओळख पुसण्याचा भाजपचा डाव आहे. पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्याचा सरकारचा निर्णय अत्यंत चुकीचा असून सरकारने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी सपकाळ यांनी केली.
प्रादेशिक संस्कृती व भाषा संपवायच्यात
प्रादेशिक भाषांचा सन्मान झाला पाहिजे व इतर भाषांचाही आदर आहे, पण भाजपाला प्रादेशिक संस्कृती व भाषा संपवायच्या आहेत. या निर्णयामुळे इतर भाषा शिक्षकांच्या नोकऱ्यावर गदा येऊ शकते. हिंदू, हिंदी व हिंदुराष्ट्र लादण्याचा हा अजेंडा असून अशा सक्तीला काँग्रेसचा विरोध आहे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.