फडणवीसांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याच्या गाडीतून कोरटकर तेलंगणात पळाला होता, काँग्रेसने पुरावेच दिले

प्रशिक पडवेकरच्या गाडीतून प्रशांत कोरटकर तेलंगणात पळाला होता. हा पडवेकर मुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचारी आहे, असा आरोप काँग्रेसने केला.

काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी याबाबत एक्स पोस्ट केली आहे. त्यात कोरटकर हा पडवेकर याच्या खांद्यावर हात ठेवून उभा असल्याचा एक फोटो आहे. यात कोरटकरने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दुसऱ्या फोटोत पडवेकरची कार दिसत असून याच गाडीतून कोरटकर तेलंगणात पसार झाला होता व ही गाडी सध्या कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात आहे, असे लोंढे यांनी नमूद केले आहे. हा पडवेकर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यालयातील (सीएमओ) कर्मचारी आहे अशी माहिती मिळाली असून याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनीच खुलासा करावा, असे लोंढे यांनी पुढे नमूद केले आहे.

कोरटकरला खरी मदत कोण करत होतं ते सांगाच

कोरटकरला तेलंगणामधून अटक केली त्यावेळी त्याच्यासोबत प्रशिक पडवेकर होता. मग त्याला का लपवून ठेवले आहे, त्याला का समोर आणले जात नाही. महिनाभर प्रशांत कोरटकरला खरी मदत कोण करत होते, ते पुढे का येत नाही, अशा प्रश्नांची सरबत्ती करतानाच कोरटकरच्या अटकेसंदर्भात काही माहिती का लपवली जात आहे?, असा सवाल लोंढे यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे खरे प्रेमी असाल तर कोरटकरच्या अटकेसंदर्भात सर्व माहिती जाहीर करा, असे आव्हानच लोंढे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.