मोदींनी रेलगाडीला बैलगाडी बनवले, व्हिडीओ शेअर करत काँग्रेसचा तडाखा

सर्वसामान्यांची लाईफलाईन अशी ओळख असलेल्या रेल्वेचे सध्याचे चित्र अत्यंत विदारक आहे. अनेक रेल्वे एक्सप्रेसमध्ये सामान्य जनता ही गुराढोरांसाऱखी भरून प्रवास करत असते असे चित्र पाहायला मिळते. एक्सप्रेसच्या जनरल डब्ब्यात पाय ठेवायलाही जागा नसते. दोन दिवसांपूर्वी लखनऊवरून हरिद्वाराला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस देखील प्रवाशांनी खचाखच भरलेली असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले. यात अनेक प्रवासी हे विनातिकीट प्रवास करत असल्याचे दिसून आले.

एकिकडे रेल्वेकडून देशाला सर्वाधिक कर मिळतो मात्र त्या तुलनेत प्रवाशांच्या सोयीसुविधांमध्ये फार काही बदल झालेला दिसत नाहीए. ‘मोदी सरकार जनतेला बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखवत असताना प्रत्यक्षात सामान्यांच्या प्रवासाचे साधन असलेल्या रेल्वेची मात्र बैलगाडी झाल्याची टीका’ काँग्रेसने केली आहे.

काँग्रेसने रेल्वेच्या सध्याच्या परिस्थितीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून त्यावरून काँग्रेसने केंद्र सरकारला फटकारले आहे. ” मोदींनी रेल्वेला उद्ध्वस्त केले आहे. देशाची लाईफलाईन असलेल्या या रेल्वेत आज पाय ठेवायलाही जागा नसते. लोकं गुरा ढोरांसारखे प्रवास करायला मजबूर आहेत. मोदींनी बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखवले मात्र रेल्वेगाडीला बैलगाडी बनवले. लोकं वैतागले आहेत. पण मोदींना त्यांची फिकीर नाही. मोदी मजेत त्यांच्या विमानात फिरत असतात व लोकं बरबाद झाली आहेत”, अशी पोस्ट काँग्रेसने शेअर केली आहे.