थाटात केलेली नोटाबंदी, घाईघाईने अमलात आणलेली जीएसटी कररचना आणि चीनमधून होणारी वाढती आयात यांद्वारे रोजगार निर्मिती करणाऱया मध्यम आणि लघु व्यवसाय उद्योगांच्या मुळावरच घाव घालून मोदी सरकारने भारतातील बेरोजगारीचे महासंकट अधिकच भीषण बनवले आहे, असा आरोप काँग्रेसने आज केला आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सिटीग्रुप या जागतिक स्तरावरील बँकेच्या एका नवीन अहवालाचा हवाला देत, भारतातील बेरोजगारीविषयीचा त्यातील तपशील आणि आकडेवारी धक्कादायक असल्याचा दावा केला आहे. निवडणूक प्रचारादरम्यान ज्या मुद्दय़ाकडे काँग्रेस वारंवार लक्ष वेधत होती त्याचीच पुष्टी हा अहवाल करत असल्याचे रमेश यांनी म्हटले आहे.
मोदींमुळे गेल्या 45 वर्षांतील सर्वाधिक बेरोजगारी
फक्त मोठय़ा समूहांना अनुकूल असलेल्या आर्थिक धोरणांमुळे, आपल्या पंतप्रधानांनी 45 वर्षांमधील सर्वाधिक बेरोजगारीचा दर देशात निर्माण केला आहे. पदवीधर तरुणांमध्ये तर बेरोजगारीचा दर 42 टक्के आहे, असा आरोप रमेश यांनी केला.